मराठी शाळांनी उघडली इंग्रजीची खिडकी
मुंबई, प्रतिनिधी, दि. 20 - मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे; मात्र त्यांना इंग्रजीही उत्तम यावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी मराठी शाळांनी आता ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेतली मुले आता इंग्रजी हीसुद्धा प्रथम भाषा म्हणूनच अभ्यासणार आहेत, तर गोरेगावच्या अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलमध्ये येत्या जूनपासून प्रत्येक विषय वर्गात एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी, अशा दोन्ही भाषांमधून शिकवला जाणार आहे.
बालमोहनमध्ये आता नववीत असणारे विद्यार्थी पुढच्या वर्षीची दहावीची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन प्रथम भाषांसह देणार आहेत. 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून हा बदल करताना शाळेने शिक्षकांना प्रशिक्षण दिलेच; पण मुलांची तयारी व्हावी, निकालावर परिणाम होऊ नये, यासाठी नववीच्या वर्षात इंग्रजीच्या 12 परीक्षा घेतल्या. त्यातून मुलांना काय आणि कुठे अडचणी येतात, याचा अंदाज येत गेला आणि तशा सुधारणा करता आल्या, असे बालमोहनचे मुख्याध्यापक मधुकर यादव यांनी सांगितले.
इंग्रजी येत नाही म्हणून मुलांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होऊ नये, असे आम्हाला वाटत होते. सेमी इंग्रजी असल्यामुळे गणित आणि विज्ञान मुले इंग्रजीत शिकत असली, तरी इतिहास आणि भूगोल हे विषय समजण्यासाठी आणि लिहिण्यासाठी आवश्यक असणार्या मातृभाषेतूनच त्यांना शिकता यावेत, यासाठी आम्ही परीक्षा मंडळाकडे बराच पाठपुरावा करून हा बदल केला आहे, असे यादव म्हणाले.
इंग्रजी प्रथम भाषा घेणे विद्यार्थ्यांना सक्तीचे नाही; मात्र तरीही ते सुरू केल्यावर आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेतल्या पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशावर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षण मंडळ, गोरेगाव या संस्थेच्या अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलमध्ये द्विभाषिक पद्धत अवलंबताना सर्व विषयांचे शिक्षक त्या त्या विषयांची परिभाषा, त्यातले विशिष्ट शब्द मराठी आणि इंग्रजी, अशा दोन्ही भाषांमध्ये सांगणार आहेत. विषयांतल्या, विशेषत: गणित आणि विज्ञानातल्या संकल्पना मराठीतूनच स्पष्ट केल्या जातील; मात्र नंतर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून मुलांना विषय तपशीलवार समजावून सां
गितला जाईल. आकलनासाठी मातृभाषाच हवी, मात्र ज्ञानाची, संपर्काची आणि पुढच्या अभ्यासाचीही भाषा असणारी इंग्रजी मुलांना यायलाच हवी, हे ओळखून आम्ही हा निर्णय घेतला आहे.