कन्हैयाच्या जिवाला धोका, सुप्रीम कोर्टात याचिका
नवी दिल्ली, 19 - तिहार तुरुंगात जीविताला धोका असल्याचे म्हणत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात त्याने जामिनासाठी विनंती केली आहे. दिल्ली पोलिसांनीही जामिनाला विरोध करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे जामीन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कन्हैयाला पाठिंबा म्हणून दिल्लीत मंडी हाऊस ते जंतरमंतरपर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. कन्हैयावरील देशद्रोहाचा आरोप मागे घेण्याची मागणी त्यांनी
केली. दरम्यान, जेएनयूच्या मुद्द्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नेत्यांसोबत जाऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. नंतर राहुल म्हणाले, देशावर एकच (संघाची) विचारधारा लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारविरुद्ध बोलणार्याला दडपण्यात येते. पतियाळा हाऊस कोर्टाच्या आवारात विद्यार्थी, पत्रकारांना मारहाण झाली. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असे राहुल म्हणाले.
सोराबजी बाजू मांडू शकतात सुप्रीम कोर्टात कन्हैयाची याचिका वकील आनंदिता पुजारी यांनी दाखल केली. वकील वृंदा ग्रोवर व राजू रामचंद्रन यांनी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर व ए.एम. सप्रे यांच्या पीठासमोर प्रकरणाचा उल्लेख केला. गुरुवारीच सुनावणी व्हावी असाही प्रयत्न होता. पण पीठाने शुक्रवारी सुनावणी ठेवली. प्रसिद्ध घटनातज्ज्ञ सोली सोराबजी कन्हैयाची बाजू मांडू शकतात.पतियाळा हाऊस कोर्टातील हिंसाचार पोलिस व हल्लेखोरांचे संगनमत होते, असा दावा ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी केला. कोर्टाच्या आवारात पाहणीसाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या सहा सदस्यांच्या समितीचे ते सदस्य होते. पोलिस हल्लेखोरांची ढाल झाले होते. आम्ही आत गेलो तेव्हा बंदी घातली होती तो राजरोस फिरत होता. हायकोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलने त्या व्यक्तीला अटक करण्यास सांगितले, पण पोलिसांनी ते केले नाही, असेही धवन म्हणाले.