मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षासह मुख्याधिकार्यांचा सत्कार
रहिमतपूर, 07 - स्वच्छ भारत अभियानांतर्गत रहिमतपूर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपरिषदेने अचूक नियोजन करून यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ. हसिना डांगे, मुख्याधिकारी सौ. सुषमा कोल्हे व पदाधिकार्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य सचिव स्वाधीनक्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, नगरपालिका संचालनालयाच्या आयुक्त तथा संचालक (प्रशासन) मीता लोचन, रहिमतपूरचे उपनगराध्यक्ष अॅड. सचिन कुंभार, नगरसेवक शशिकांत भोसले, सौ. नंदा कदम, सौ. मंगल माने, संभाजी माने-पाटील, विक्रम माने, स्वच्छता निरीक्षक आर. सी. माने उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य सरकारने स्वच्छ महाराष्ट्र संकल्प केला आहे. या अभियानात यश मिळविणार्या नगरपालिकांचा नरिमन पॉईंट (मुंबई) येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सप्तपदी स्वच्छतेची अंतर्गत रहिमतपूर पालिकेने शहरात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये बांधून नागरिकांमध्ये जागृती केली. उघड्यावर शौचालयास बसण्यास बंदी आणून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी यशस्वी पाऊल उचलले. रहिमतपूर शहर हागणदारीमुक्त झाल्याने शासनाकडून एक कोटीचे अनुदान मंजूर होणार आहे. त्यातील 30 टक्के निधी सुरुवातीला व उर्वरीत निधी शहरातील स्वच्छतेची तपासणी करून मिळणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.