समाजाचे प्रश्न सोडविणे पत्रकारांचे कर्तव्य-ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब
बीड,दि. 7 - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने स्काऊट भवन येथे पत्रकारांसाठी अभ्यास वर्गाची सुरूवात केली. यावेळी विचारवंत अमर हबीब यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करतांना गल्लाभरू, पोटभरू पत्रकारिता करण्यापेक्षा नादिक पत्रकारिता करा असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन संतोष मानूरकर, वसंत मुंडे, प्रा.नामदेव सानप, अजित वरपे, बालाजी मारगुडे आदींची उपस्थिती होती.
बदलता काळ आणि पत्रकारिता या विषयावर विचारवंत अमर हबीब यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना अमर हबीब म्हणाले की, पुर्वीची पत्रकारिता ही लिहिणे, छापणे आणि वाटणे अशी होती. परंतू काळ बदलत चाललेला आहे. आत्ताची पत्रकारिता करतांना बातमी दडवली जावू शकत नाही. समाजाचे प्रश्न सोडविणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. विचारवंत अमर हबीब यांनी त्यांचा पत्रकारितेचा प्रवास सांगताना, चांगल्या-वाईट गोष्टीचा अनुभव सांगितला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, पत्रकारिता करतांना गल्ला भरू आणि पोटभरू पत्रकारिता न करता नादिक पत्रकारिता करा, नादिक पत्रकारिता समाजाचे प्रश्न सोडवू शकते. सध्या सोशल मिडीयाचा वापर पत्रकारिता करण्यासाठी चांगला असून यातून चांगल्या गोष्टी घ्यायला हव्यात असेही ते म्हणाले.
शेवटी त्यांनी माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता, कोणत्या काळात सभ्य होती माणसे, तो काळ सांगा कोणता असे सांगून पत्रकारांना नव्या आवाहनांना सामोरे जावून नादिक पत्रकारिता करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पत्रकारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.