Breaking News

भाजपच्या 2 आमदारांना 20 हजार रुपये दंड

मुंबई, 19 - अनधिकृत होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी भाजपचे आमदार व पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, तसेच भाजपचेच दुसरे आमदार पराग अलवणी यांच्यासह इतर 15 राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाने 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या संस्थेला देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.  
या प्रकरणी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली. याबाबत दोन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या आहेत. गुरुवारी सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, ‘उच्च न्यायालयाने होर्डिंग्ज व बॅनर लावण्याबाबत दिशानिर्देश घालून दिले आहेत. तरीही राजकीय पक्ष व नेते त्याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे बेकायदेशीर फलक लावत आहेत. त्यामुळे त्यांना आता प्रत्येकी 20 हजारांचा दंड ठोठावण्यात येत आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार, पराग अलवणी यांच्यासह इतर राजकीय पक्षांच्या 15 कार्यकर्त्यांचा त्यात समावेश आहे. ही रक्कम 26 फेब्रुवारीपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.