तरूणाईला आकर्षित करतेय खादी - पंतप्रधान
नवी दिल्ली, 31 - देशातील तरूणाईला फॅशनच्या युगात खादी आकर्षित करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांशी नवीन वर्षातील पहिली मन की बात केली.
पंतप्रधान म्हणाले, भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता हे खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले होते. देशातील तरूणाईला फॅशनच्या युगात खादी आकर्षित करत आहे. तसेच, यावेळी त्यांनी देशवासियांना खादीचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला. महात्मा गांधींना श्रद्धांजली म्हणून प्रत्येकाने खादीचा वापर करावा. प्रत्येकाकडे एक तरी खादीचा पोशाख जरूर असावा. त्यातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. 26 जानेवारी रोजी हरियाण, गुजरातमध्ये एक अनोखा प्रयोग दिसला. गावातील सर्वात शिक्षित मुलीला ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात आला. या उपक्रमातून ‘बेटी बचाव- बेटी पढाओ’ या योजनेचा एक उत्तम संदेश या कृतीतून देण्यात आला. आंध्र प्रदेशमधील विशाखा पट्टणम येथील समुद्र किनार्यावर इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होत आहे, ते नक्की पहा. जगातील प्रमुख देशांची लढाऊ जहाजं व युद्धनौका या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होणार आहे. भारताने ही मोहीम आयोजित केल्याचा अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.