मुद्रा कर्ज नाकारल्याने बेरोजगार तरुणांचे उपोषण
अहमदनगर । प्रतिनिधी । 07 - पारनेर तालुक्यातील जवळा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेने मुद्रा कर्ज नाकारल्याने बेरोजगार तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.5 रोजी बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, जिल्हाधिकारी यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे व भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी याबाबत बँक अधिकार्यांशी चर्चा घडवून आणली. ही चर्चा सकारात्मक झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जवळा येथे मुद्रा कर्जाचा विशेष मेळावा घेण्याचे आश्वासन श्री.गांधी यांनी दिले.
या आंदोलनात रामदास घावटे, महेंद्र पठारे, महेंद्र आढाव, किशोर गाडीलकर, युवराज साळवे, कृष्णा पाटोळे, संतोष शेटे, राजू रासकर, रामदास शिंदे, उमेश जाधव यांच्यासह बेरोजगार तरुण सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील जवळा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत तरुणांना रोजगारासाठी कर्ज दिले जात नाही, यासाठी बँक कर्मचार्यांकडून वेगवेगळी कारणे सांगून अडवणूक केली जाते. याविरोधात या तरुणांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, जिल्हाधिकारी अनिल कवडे व भाजपचे नगरसेवक गांधी यांनी बँक अधिकार्यांशी चर्चा घडवून आणली. सकारात्मक चर्चा झाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, गांधी यांनी जवळा येथे विशेष मेळावा घेण्याचे आश्वासन दिले.