इलेक्ट्रीक ठिणगीमुळे गादी कारखान्यास आग
अहमदनगर । प्रतिनिधी । 07 - नविन टिळक रस्त्यावरील सिना नदीच्या काठावर असलेल्या इमामवाडा भागातील हजारी गादी भंडार या गादी कारखान्यास इलेक्ट्रीक मोटारमधील स्पार्किंगची ठिनगी उडून कापसावर पडल्याने आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली. या घटनेत कापूस, तयार गाद्या व इतर साहित्य असा 60 हजार रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. अग्निशामक विभागाच्या पथकाने आग आटोक्यात आणली.
मुदस्सर अन्सार शेख यांच्या मालकीचा गादी कारखाना आहे. गादी कारखान्यात मागील बाजुला कापूस पिंजण्याचे काम मशिनद्वारे सुरु होते. या मशिनच्या ईलेक्ट्रीक मोटारमध्ये स्पार्किंग होऊन त्याची ठिनगी कापसावर पडली. त्यामुळे आग लागली. असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. मागील बाजूस वरील प्रकार झाल्यानंतर काही वेळाने धुराचे लोट दिसू लागल्यानंतर आग लागल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांची गर्दी जमा झाली. सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांनी आगीची माहिती अग्निशामक विभागात दिली. घटनास्थळी पथक पोहचताच त्यांनी आग लागल्या ठिकाणी पाण्याचा मारा करुन अवघ्या अर्धा तासात आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे परिसरात पळापळ झाली. आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, या आगीत जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शहरासह उपनगरातही गादी कारखाने मोठ्या प्रमाणावर असून हे मध्यवस्तीच्या ठिकाणी आहेत. मात्र, गादी कारखाना मालकाकडून याबाबत कोणतीही दक्षता घेतली जात नाही. सध्या इलेक्ट्रीक मशिनद्वारेच कापूस पिंजला जातो. बुधवारी घडलेल्या घटनेची पुन्हा दुसर्या ठिकाणी पुर्नावृत्ती होऊ शकते. त्यासाठी गादी कारखाने व त्यांच्या मालकांना आग विरोधात प्रतिबंधक उपाययोजना करण्यासंदर्भात सुचना कराव्यात हे काम मनपाने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे.