कमी गर्दीच्या लोकलची माहिती मिळणार एम इंडिकेटरवर
मुंबई, प्रतिनिधी, दि. 1 - वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सातत्याने ओसंडून वाहत असतात. त्यामुळे दिवसभरात लोकलला गर्दी असते. ही गर्दी टाळावी यासाठी अनेक जण चारपाच लोकल सोडून रिकामी येणारी लोकल पकडण्याला प्राधान्य देतात. यावर आता एम इंडिकेटरने प्रवाशांना दिलासा दिला आहे. एम इंडिकेटरवर गर्दी कमी असलेल्या लोकलची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 26 जानेवारी रोजी लोकलच्या वेळापत्रकात बदल झाल्यानंतर एम इंडिकेटरनेही रेल्वे प्रवाशांसाठी कमी गर्दी असणार्या लोकलची माहिती देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे लोकांना प्रवासाला निघण्यापूर्वी कमी गर्दीच्या लोकल शोधण्याचा पर्याय मिळाला आहे. सध्या एम इंडिकेटवर पश्चिम रेल्वेवरील कमी गर्दीच्या लोकलची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. पश्चिम रेल्वेला बोरिवली, दादर आणि चर्चगेट यांसारख्या ठिकाणांहून किंवा त्या दिशेने प्रवास करताना कमी गर्दीच्या लोकलची माहिती ऍपमध्ये विशिष्ट अशा हिरव्या रंगात ट्रेनच्या वेळेपुढे दाखविण्यात येत आहे. आता सोमवारपासून ही सुविधा मध्य रेल्वेवरील कमी गर्दीच्या लोकलच्या अपडेट ऍपवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एम इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके यांनी दिली. सुरुवातीच्या स्थानकातच लोकल खचाखच भरलेल्या असतात. अशा वेळी एकापाठोपाठ एक लोकलचे वेळापत्रक तसेच महत्त्वाच्या स्टेशनव्यतिरिक्त मधल्या स्थानकातून सुटणार्या लोकलमध्ये तुलनेत कमी गर्दी असते. अशाच लोकल हिरव्या रंगाने ऍपच्या वेळापत्रकात दिसतील. मुंबई लोकलच्या गर्दीच्या मुद्द्यांवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत आहे. लोकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. या उपाययोजनेची अंमलबजावणी करताना प्रवाशांची मते जाणून घेण्यात आली आहेत. प्रवाशांनी व्यक्त केलेल्या मतांवर सलग 10 दिवस काम करून पश्चिम रेल्वे मार्गावरील कमी गर्दीच्या लोकलच्या वेळा शोधून काढण्यात आल्या आहेत. या पर्यायामुळे लोकांना प्रवासाला निघण्याआधीच कमी गर्दीच्या लोकल ट्रेन शोधण्याचा पर्याय उपलब्ध झाला असल्याचे टेके यांनी सांगितले.
पीक अव्हर्ससाठीचे असे झाले नियोजन : एम इंडिकेटरच्या टीमने प्रत्यक्ष गर्दीच्या वेळेतल्या विविध ठिकाणांहून सुटणार्या लोकलची पाहणी केली. त्यानंतरच सुरुवातीच्या आणि मधल्या स्टेशनवरून सुटणार्या लोकलची माहिती घेतली. त्यानुसार ही माहिती ऍपच्या वेळापत्रकात अपडेट करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील माहिती अपडेट करण्याचे काम सुरू असून, मध्य रेल्वेवरील लोकलची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.