Breaking News

कोल्हार घोटी राज्यमार्गाची दुरावस्था


अकोले / प्रतिनिधी 
कोल्हार घोटी राज्यमार्गासाठी शासनाने भरीव रकमेची तरतूद केली आहे. परंतु शासनाच्या जीएसटीच्या जाचक निर्बंधांमुळे एकही ठेकेदार या रस्त्याचे काम घेण्यास धजत नसल्याचे वास्तव चित्र दिसत आहे. या रस्त्यावर जागोजागी फूट दीड फुटाचे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता प्रवास करण्यालायक राहिला नसल्याने यावर रोज अपघात घडत आहेत. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या रस्त्याच्या कामावरून आपली राजकीय पोळी भाजत असून एकमेकांवर टीकाटिप्पणी करीत आहेत.
कोल्हार घोटी राज्यमार्गावर असलेल्या संगमनेर ते अकोले तालुक्यातील बारी गावापर्यंत असलेल्या 60 किमीच्या रस्त्यासाठी केंद्र सरकारने 141 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला. या रस्त्याची कधी न झालेली अशी दुरावस्था गेल्या तीन वर्षांपासून झाली आहे. रस्त्यावर जागोजागी एक ते दोन फुटापर्यंत खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्डे चुकविताना अनेक दुचाकीस्वार जखमी होत असून अनेकांना आपले प्राणास मुकावे लागले. कोल्हार घोटी या मार्गाच्या कडेला वसलेल्या धंदारफळ, कोकणेवाडी, कळस खुर्द, कळस बुद्रुक, मनोहरपूर, सुगाव, शेकईवाडी, अकोले शहर, कॉलेज परीसर, नवलेवाडी फाटा, इंदोरी, राजूर, रंधा या ठिकाणाहून जाणार्‍या रस्त्यावर विनाखड्डयाचा 100 फूट देखील रस्ता उपलब्ध नाही. अकोले ते संगमनेर हे 22 किमीचे अंतर एसटी बसपूर्वी अर्धा तासात पार करायची. मात्र हेच अंतर आता पार करण्यासाठी एक तासाचा वेळ लागत आहे. या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून आ. वैभव पिचड, भाजप सेनेचे अकोले तालुक्यातील कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्यास निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे या रस्त्याच्या निर्मितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर देखील काढले. परंतु एकाही ठेकेदाराने या कामासाठी ऑनलाईन टेंडर भरले नाही. एरवी एखादे काम आपल्याला कसे मिळेल यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उंबरठे झिजवणार्‍या ठेकेदारांनी मात्र या कामापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. याखेरीज या कामासाठी मंजूर असलेला 141 कोटींचा निधी हा ठेकेदाराला दोन ते तीन टप्प्यात मिळणार नाही. सुरुवातीला रस्त्याच्या कामासाठी व काम पूर्ण होईपर्यंत शासन 40 टक्के रक्कम ठेकेदाराला देणार आहे. यानंतर राहिलेली 60 टक्के रक्कम ही काम पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षापर्यंत टप्याटप्प्याने देण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यामुळे हा धोका पत्करण्यास तयार होत नाही. कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संगमनेर हद्दीतील तीन ते चार किमी रस्त्याची डागडुजी करण्यात आली. तसेच दोन दिवसांपासून अकोले शहर परिसरात ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याचे काम सुरू झाल्याने या प्रवासात नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. 


कोट -
कोल्हार घोटी या राज्यमार्गावर सध्या खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हा महत्वाचा दळणवळनाचा मार्ग आहे. रस्त्याचं काम जेंव्हा होईल तेंव्हा होईल परंतु सध्यातरी प्रशासनाने या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कष्ट घ्यावे.
-विनोद हांडे(जिल्हा उपाध्यक्ष,काँग्रेस)