Breaking News

नाशिक विभागातून निष्कलंक प्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदार प्रयत्नशील

ज्ञानदानातून नवी पिढी घडविण्याची आणि त्या पिढीच्या हाती देश सोपविण्याचे कर्तव्य पार पाडणार्‍या गुरूजनांचे विधीमंडळात प्रतिनिधी पाठवण्यासाठी येत्या 25 जूनला निवडणूक होत आहे. या पवित्र क्षत्रात काम करणार्‍या महानुभवांचा नेताही तितकाच जबाबदार हवा ही अपेक्षा व्यक्त होत असेल तर त्यात आक्षेपार्ह काही नाही. एरवीही संसदीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीमत्वाची छबी शुध्द असावी किमान फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असू नयेत अशी संहिता सांगते. तथापी अनेक खासदार आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे वृत्त नेहमीच व्हायरल होते. याबाबत समाजात आणि काही प्रमाणात राजकारणात चिंता व्यक्त केली जात असतानाच शिक्षक मतदार संघात 25 जून रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीत नशिब अजमावणार्‍या उमेदवारांमध्ये शिक्षक मतदार तुलना करू लागले आहेत.

या अनुषंगाने नाशिक शिक्षक मतदार संघातून आमदारकीचे स्वप्न पाहत असलेले शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, माजी खा. प्रतापदादा सोनवणे, भाजपाचे अनिकेत पाटील, टिडीएफचे अधिकृत व राष्ट्रवादी - काँग्रेस पुरस्कृत प्रा. संदीप बेडसे, टीडीए बंडखोर भाऊसाहेब कचरे, शाळीराम भिरूड, अमृत शिंदे या प्रमुख उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित असलेले शिक्षक तुलना करू लागले आहेत. या सर्व उमेदवारांमध्ये कुठल्या उमेदवाराचा आजवरचा इतिहास काय आहे, कुणावर किती आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, कोण किती श्रीमंत आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
या पलिकडे जाऊन या उमेदवारांमध्ये संस्थाचालक कोण, शिक्षण संस्थामध्ये संस्थाचालकांचा शिक्षकांशी व्यवहार कसा आहे, यावरही खुमासदार चर्चा सुरू आहे.
उमेदवारांविषयी मतदारांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू असतानाच कुठल्या उमेदवारावर कुठले गुन्हे दाखल आहेत, गुन्ह्यांचे गांभिर्य काय? यासंदर्भात सविस्तर वृत्त व्हायरल झाले आहे. या गुन्ह्यांसदर्भात निवडणूक आयोगाकडे संबंधित उमेदवाराने शपथपत्रावर दिलेल्या माहीतीवर हे वृत्त आहे. निवडणुक आयोगाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहीतीनुसार या उमेदवारांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद किशोर दराडे यांच्या नावावर असल्याचे दिसते. त्या खालोखाल प्रताप सोनवणे यांच्या नावावर गुन्ह्यांची नोंद आढळते.
प्राप्त माहीतीनुसार किशोर दराडे यांच्यावर भादवि कलम 428, 420, 463, 464, 465, 468, 471, 120(ब), 34 तर प्रताप सोनवणे यांच्यावर भादवि 406, 409, 467, 471, 34 अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद दिसते. संपत्तीच्या बाबतीतही किशोर दराडे हेच आघाडीवर असून 12 कोटी 31 लाख 14 हजार तर पत्नीच्या नावावर 16 कोटी 23 लाख 94 हजार एवढी संपत्ती दाखवण्यात आली आहे. प्रताप सोनवणे यांच्याकडे 23 कोटी 89 लाख 77 हजार 58 रूपये तर पत्नीच्या नावे 3 कोटी 18 लाख 46 हजार 950 रूपयांची संपत्ती दिसते. अनिकेत पाटील प्रा. संदीप बेडसे, भाऊसाहेब कचरे, शाळीराम भिरूड, अमृत शिंदे या उमेदवारांविरूध्द दाखल असल्याची नोंद नाही. निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञा पत्रावर ही माहीती सादर झालेली असल्याने मतदारांच्या मनात माहीतीविषयी कुठलीही शंका नाही. म्हणूनच या निवडणूकीत मतदार उच्चशिक्षित असल्याने विधीमंडळात त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा प्रतिनिधीही निष्कलंक, वादग्रस्त नसलेला आणि उच्चशिक्षित असावा, असा ट्रोल व्हायरल होऊ लागला आहे.