Breaking News

अग्रलेख धुमसते काश्मीर !


काश्मीरातील दहशतवाद हा प्रश्‍न काही सुटण्याची चिन्हे नाहीत. मात्र काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद कधी नव्हे तो, या वर्षी खूप तीव्र होतांना दिसून येत आहे. या दहशतवादामुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, नेहमीच तणाव पाहायला मिळत आहे. यावर्षी रमजान ईदच्या दिवशीदेखील दहशतवादी श÷स्त्र खाली ठेवतांना दिसून आले नाही. याउलट या दिवसांचा फायदा घेत, अंदाधुंद गोळीबार करण्याला या दहशतवाद्यांनी प्राधान्य दिले. जोरदार गोळीबार आणि काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली आहे. राजौरी सेक्टरमध्ये गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. दोन्ही देशांकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. मात्र पाकिस्तान आपले वचन पाळेल तर नवलच. पाकने आपले दुटप्पीधोरण सुरूच ठेवत, नेमका रमजान ईद चा दिवस हेरत हिसांचार सुरू ठेवला. त्याचाच परिणाम म्हणून सीमारेषेवरील भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. रमजान काळात भारताने शस्त्रसंधीची घोषणा केली असताना पाकिस्तानकडून कुरापती सुरूच होत्या. त्यामुळे भारताने ईदच्या दिवशी करण्यात येणार्‍या मिठाई देवाणघेवाणीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केली. दिवाळी आणि ईदच्या दिवशी सीमारेषेवर दोन्ही देशांकडून मिठाईची देवाणघेवाण केली जाते. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते. पाकिस्तानी सैनिकांकडून पुढाकार दाखविण्यात आला. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मिठाईच्या देवाणघेवाणीस नकार दर्शविला. याचबरोबर प्रत्यक्ष ताबा रेषेवरून 35 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. दहशतवादी काश्मीरमध्ये विविध भागात गटागटातून घुसण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना लागल्याचे सूत्रांकडून समजले आहे. गुप्तचर विभागाला चार वेगवेगळ्या गटात एलओसीवरून दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. लष्कर ए तोयबाचे 18 दहशतवादी कुपवाडामध्ये घुसखोरी करू शकतात. हे दोन गटात घुसून सैन्य ठाण्यांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच नौगाम सेक्टर परिसरातही 8 जण घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पुंछ सेक्टरमधून 6 दहशतवादी घुसखोरी करू शकतात. पाकिस्तान या देशाच्या विकासाच्या बाबतीत आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर, हा देश आज संपूर्णपणे मागासलेला देश आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सोयी-सुविधा मध्ये देश खूपच मागासलेला दिसून येतो. या संपूर्ण क्षेत्रात प्रगतीचे पाऊले टाकतांना पाककडून, शांतता राखण्यासाठी ठोस पावले उचलावे लागणार आहेत. आज पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांना सुरक्षा देण्याचे अड्डे बनला आहे. त्यामुळे कोणताही दहशतवादी पाकमध्ये आश्रय घेतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे पाक अशांत देशाची लॉबी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यातून पुन्हा अशांतता बघायला मिळू शकते. भारतातील औरंगजेब या जवानांचा पाककडून करण्यात आलेला छळ निंदाजनक आहे. त्यामुळे पाककडून होणार छळ किती दिवस सोसायचा हा महत्वाचा प्रश्‍न आहे. पाकविरोधात सर्वच राष्ट्रांनी बहिष्काराची भूमिका घेण्याची गरज आहे. पाकची आयात निर्यात जर पूर्णपणे बंद केली, तर पाकचा व्यापार व दळणवळण व्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊन जाईल. त्यावेळेसच पाक दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी सरसावेल. अन्यथा दहशतवाद हा आपल्या पाचवीलाच पुजलेला असेल, यात शंका नाही.