Breaking News

येसवडी चारीला पाणी न मिळाल्यास संघर्ष समिती रस्त्यावर

कर्जत तालुक्यातील येसवडी कुकडी चारीला मागील आवर्तन मिळाले नाही. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. या आवर्तनात प्राधान्याने पाणी न मिळाल्यास शेतकर्‍यांसह रस्त्यावर येवून आंदोलन करण्याचा इशारा येसवडी कुकडी चारी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
संघर्ष समितीचे अध्यक्ष बापुराव सुपेकर, उपाध्यक्ष शशिकांत लिहिणे, सचिव बंडु सुपेकर, सदस्य मोहन सुपेकर आदींनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

गेल्या आवर्तनात येसवडी चारीला पाणी पोहोचले नसल्याने, या भागातील शेतकर्‍यांत असंतोषाचे वातावरण आहे. सर्व चार्‍यांना पुरेसे पाणी दिले जाते, मात्र येसवडी चारीवर दुजाभाव होत आहे.अद्यापपर्यंत टेलच्या करमनवाडी भागापर्यंत पाणी पोहोचू दिले जात नाही. यास अधिकार्‍यांसह राजकारणीच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया मोहन सुपेकर, बंडु सुपेकर यांनी दिली. पालकमंत्री राम शिंदे यांनी मुंबईतील बैठकीत येसवडी चारीला पाणी पोहोचले नसल्याचे स्पष्ट केले. प्राधान्याने पाणी देण्याची मागणी केली. मात्र सध्या 10 ते 14 क्रमांकाच्या चार्‍यांनाच प्राधान्याने पाणी दिले जाणार असल्याचे समोर येत आहे. 15 तसेच 16 क्रमांकाच्या येसवडी चारीला प्राधान्याने पाणी मिळणार याबाबत येथील शेतकर्‍यात साशंकता आहे. धालवडी, तळवडी, बारडगाव, धुमकाई फाटा, करमनवाडी या भागातील शेतकर्‍यांवर नेहमीच अन्याय केला जात आहे. या आवर्तनात पाणी न पोहोचल्यास पुन्हा एकदा रस्त्यावर येवुन आंदोलन करु असा इशारा समितीचे अध्यक्ष बापुराव सुपेकर, मोहन सुपेकर, शशिकांत लिहिणे यांनी दिला आहे. सत्ताधारी दाद देत नसतील तर या प्रश्‍नावर विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून हा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करु असे बंडू सुपेकर यांनी सुचित केले. या चारीच्या पाण्यासाठी राजकारण आडवे येत असल्याचे ते म्हणाले. कुळधरण ग्रामविकास संघटनेनेही या प्रश्‍नावर लढा देण्यासाठी पुढे येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या आवर्तनात पाणी न पोहोचल्यास या भागातील उसाची पिके जळुन खाक होणार असुन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नावर सर्वपक्षीय लोक संघटित होत असुन सर्वांना सोबत घेवून लढा यशस्वी करण्याचा सूर समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.