'आपलेच सीड-आपलेच फीड' ही संकल्पना राबवून महाराष्ट्राला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करावे - सुधीर मुनगंटीवार
मत्स्य व्यवसाय विकासासंदर्भात राज्यस्तरीय बैठकीत ते आज बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, मल्लिकार्जुन रेड्डी,पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, पशुसंवर्धन आयुक्त अरूण विधळे, तेलंगनाच्या पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सी.सुवर्णा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यात नीलक्रांती आणायची असेल तर 'आपलेच सीड-आपलेच फीड' ही संकल्पना वेगाने राबविणे, त्यासाठीच्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करणे ही अगत्याची बाब आहे, असे सांगून अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात मत्स्य व्यवसायाला चालना देताना या क्षेत्रातील योजना, योजनांची गती आणि नियोजन या सर्वच क्षेत्रात मिशन मोड स्वरूपात काम होण्याची गरज आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. वित्त विभाग पूर्ण ताकदीने या विभागाच्या मागे उभा राहील. विभागाने काही कालबाह्य योजनांमध्ये बदल करण्याची, काहींचे नियम,निकष आणि अनुदानाचे स्वरूप बदलण्याची गरजही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.