Breaking News

कर्नाटकात शाह यांच्या विमानाची झाडाझडती


हुबळी : कर्नाटक राज्यात होणार्‍या विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विमानाची तपासणी करण्यात आली आहे. एका निवडणूक अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार आचारसंहितेच्या कारणामुळे शाह यांच्या विमानाची तपासणी करण्यात आली. अमित शाह हे 2 दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. यावेळी शाह यांच्याबरोबर भाजपचे आणखी 2 नेतेही उपस्थित होते. भाजप अध्यक्ष शाह यांचे विमान हुबळी विमानतळावर पोहोचताच निवडणूक आयोगाच्या 3 अधिकार्‍यांनी अचानकपणे शाह यांच्या विमानाची तपासणी केली. या कारवाई दरम्यान आचारसंहितेचा भंग होईल, असे कोणतेही साहित्य मिळाले नसल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.यावेळी खासदार प्रल्हाद जोशी हे अमित शाह यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. तेथून शाह हे हवेरी येथील ब्यादगी तालुक्यात आयोजित ओबीसी समाजाच्या संमेलनाला मार्गदर्शन केले. यावेळी शाह यांनी भारतीय जनता पार्टी (बीजेपी) कर्नाटक मध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तसेच भाजप सरकार संसदेच्या दोन्ही सभागृहात ओबीसी विधेयक मंजूर करेल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.