Breaking News

सोळा लाखाची फसवणूक करणार्‍या तिसर्‍या भामट्याचा शोध सुरू

रत्नागिरी, दि. 14, ऑक्टोबर - चिपळूण व खेड तालुक्यातील ग्रामस्थांची सोळा लाखाची आर्थिक फसवणूक करणार्या दोघांना चिपळूण पोलिसांनी सांगली व कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटकही करण्यात आली आहे. पोलिसांना आता तिसर्या भामट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 
याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतील जे. के. फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी विजय महादेव ढोपे (वय 27) याने कमी व्याजदराच्या कर्जाचे आमिष दाखवून चिपळूण व खेड तालुक्यातील नागरिकांचा विश्‍वास संपादन केला. एकूण कर्जाच्या रकमेवर दहा टक्के कमिशन म्हणून 58 जणांकडून त्याने पंधरा ते पंचवीस हजारापर्यंत एकूण 16 लाख रुपये गोळा केले. त्यानंतर कर्जाची रक्कम 10 ऑक्टोबरला देण्याचे कबूल केले. त्यादिवशी चिपळूणमधील अमरदीप खताते आणि अरविंद पाटील या दोघांकडे त्याने पैशाच्या बॅगा दिल्या. सर्व कर्जदार एकत्र आल्यानंतर बॅगा उघडायची सूचना त्याने केली. दुसर्‍या दिवशी सर्व कर्जदारांसमोर बॅगा उघडण्यात आल्या. त्यामध्ये पैशाऐवजी कागदाची बंडले सापडली. त्यानंतर संबंधित कर्जदार बॅगा घेऊन चिपळूण पोलिस ठाण्यात गेले. पोलिस निरीक्षक सौ. निशा जाधव यांना घडलेला प्रकार सांगितला. सौ. जाधव यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी सांगली व कोल्हापूर परिसरात आपले कर्मचारी पाठविले.
विजय महादेव ढोपे याला शिराळा (कोल्हापूर) आणि श्रीकांत लग्मान्ना शिंगाई याला जयसिंगपूर येथून ताब्यात घेण्यात आले. चिपळुणात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याची महिती पोलिसांना मिळाली असून त्याचा शोध सुरू असल्याची महिती पोलिस निरीक्षक सौ. निशा जाधव यांनी दिली.