पत्रकारितेतील समर्पित व्यक्तीमत्वाचा गौरव - मुख्यमंत्री
नागपूर,दि.17 : पत्रकारीता क्षेत्रात दीर्घकाळापासून आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आणि मनिष अवस्थी यांना स्व.अनिल कुमार स्मृती पुरस्कार देऊन विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघाने पत्रकारितेतील समर्पित व्यक्तीमत्वाचा गौरव केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व.अनिल कुमार स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर,गिरीश गांधी, पत्रकार प्रदीप मैत्र व शिरीष बोरकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अशोक वानखेडे आणि मनिष अवस्थी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्व.अनिल कुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मनिष अवस्थी आणि आपण समकालिन असून मनिष यांनी पत्रकारिता तर आपण राजकारण आणि समाजकारण सुरु केले होते. मनिष अवस्थी यांचा प्रवास अत्यंत खडतर असून त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विधायक व समाजाभिमूख पत्रकारिता केली. अशोक वानखेडे यांचा आणि आपला परिचय अलिकडचा असला तरी परखड व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित आहेत. चांगल्या कामाचे कौतुक करणे त्यांच्या स्वभावात असून टिका सुद्धा संयमाने करणे अशोक वानखेडे यांना उत्तम प्रकारे जमते.दोन्ही सत्कारमूर्ती मैत्री जपणारे असून मित्रांच्या सत्काराला उपस्थित राहण्याचा आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अशोक वानखेडे आणि मनिष अवस्थी यांचा पुढील वाटचालीस मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्यात.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पत्रकारांना टिका करावी मात्र ती विधायक असावी. विचारभिन्नता नाही तर विचारशून्यता ही खूप मोठी समस्या आहे. समाजाप्रती संवेदनशिलता जपण्याची शक्ती पत्रकारितेत असून अशोक वानखेडे आणि मनिष अवस्थी यांनी आपल्या लेखनीतून ही संवेदनशिलता कायम जपली आहे. समाज आणि देश चांगल्या मुल्यावर टिकून आहे. समाजात ज्या चांगल्या व्यक्ती आहेत त्यांच्यामुळेच देश आणि समाज एकसंघ आहे, असे गडकरी म्हणाले.
अशोक वानखेडे आणि मनिष अवस्थी हे आपले चांगले मित्र असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कार्याचे आपल्याला नेहमी कौतुक वाटते, असे ते म्हणाले. पत्रकारितेने नेहमी चांगल्याच्या पाठिशी उभे राहावे. आणि वाईट बाबींना कमी स्थान द्यावे, असे ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी सांगितले. पत्रकारितेपुढे विश्वासार्हतेचे मोठे आव्हान असून एकाच वृत्ताची चार-चार वृत्तपत्र किंवा वाहिन्या पाहून खात्री करावी लागते ही बाब पत्रकारितेच्या विश्वासार्हतेच्या पराभव असल्याचे कुवळेकर म्हणाले. जे चांगले दिसते ते अधोरेखित व जे वाईट आहेत ते लहान करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. सत्कारला उत्तर देतांना अशोक वानखेडे म्हणाले की, पत्रकारांनी नेहमी वॉच डॉगची भुमिका बजवावी. तर मनिष अवस्थी यांनी आपण20 वर्षापूर्वी पत्रकारिता सुरु करतांना नागपूर एक दिवस देश आणि प्रदेशावर राज्य करेल असे सांगितले होते त्याचा आज प्रत्यय येत असल्याचे नमूद केले. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे यांचे भाषण झाले. स्व.अनिल कुमार पत्रकारिता पुरस्काराची परंपरा व इतिहास याबद्दल गिरीष गांधी यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन नितीन नायगावकर यांनी केले. या सोहळ्यास पत्रकारितेतील ज्येष्ठ व्यक्ती व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.