Breaking News

1 लाख 36 हजारांहून अधिक मुलींना सायकल वाटप

मुंबई, दि. 16, सप्टेंबर - महाराष्ट्र मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता 8 ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून 5 कि.मी अंतरापर्यंत राहणार्‍या  गरजू मुलींना सायकलीचे वाटप करण्यात येत असल्याने मुलींना लांब अंतरावरील शाळेत कसं पाठवायचं हा पालकांसमोरील प्रश्‍न सुटला आहेच पण सायकल  मिळाल्याने मुलींची शाळेतील उपस्थिती देखील वाढली आहे. योजनेत आतापर्यंत 1 लाख 36 हजार 925 मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे.
योजनेत पूर्वी आय.एस.आय मार्क सायकलची किंमत 3500 रुपये इतकी गृहित धरण्यात आली होती यामध्ये शासनाकडून अनुदान स्वरूपात मुलीच्या बँक खात्यात  थेट 3 हजार रुपयांची रक्कम जमा केली जात होती. यात लाभार्थ्यांचा हिस्सा 500 रुपयांचा होता. आता सर्वसाधारणपणे या सायकलींची किंमत 4200 रुपयांपर्यंत  वाढली आहे. ही वाढलेली किंमत लक्षात घेऊन शासनाने नुकतीच अनुदानाची रक्कम 3 हजार रुपयांवरून 3 हजार 500 रुपये इतकी वाढवली आहे तर लाभार्थ्यांचे  योगदान 500 रुपयांहून 700 रुपये इतके करण्यास मान्यता दिली आहे. ही योजना ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींसाठी अतिशय उपयुक्त ठरली असून यामुळे  विद्यार्थिंनीची शाळेतील उपस्थिती वाढली असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील 125 अतिमागास तालुक्यांमध्ये ही योजना राबविली जात असून योजनेची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात येते.