Breaking News

एवढ्या वाईट पद्धतीने बाद होणारा जेसन रॉय पहिलाच फलंदाज!

टॉन्टन, दि. 25 - इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या टी-20 सामन्यात क्रिकेट इतिहासातील दुर्मिळ प्रसंग पाहायला मिळाला. पंधराव्या षटकात नॉन  स्ट्राईकला उभा असलेला इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय थ्रोच्या मध्ये आल्याने त्याला बाद देण्यात आलं. टी-20 क्रिकेटमध्ये अशा प्रकारे बाद होणारा तो पहिलाच  फलंदाज ठरला आहे.
नॉन स्ट्राईकला उभा असलेला जेसन रॉय धाव घेण्यासाठी धावला. मात्र स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाने नकार दिल्यानंतर तो परत आला. पण याचवेळी तो  फिल्डरने फेकलेल्या थ्रोच्या मध्ये आला. ज्यामुळे ऑब्स्ट्रक्टिंग दी फिल्ड म्हणजे थ्रो आणि विकेटच्या मध्ये आल्याप्रकरणी जेसन रॉयला बाद देण्यात आलं. जेसन  रॉयच्या पायाला थ्रो लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पंचांकडे अपील केली. तिसर्‍या पंचांकडे हा निर्णय गेल्यानंतर जेसन रॉयला बाद देण्यात आलं. जेसन  रॉयची विकेटच इंग्लंडच्या पराभवातील टर्निंग पॉईंट ठरला. जेसन रॉय या अजब पद्धतीने बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी करता आली  नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना 3 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.