Breaking News

26 वर्षांच्या कारकीर्दीत अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

मुंबई, दि. 08 - 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला गौरवण्यात आलं आहे. प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित रुस्तम या चित्रपटात अक्षय कुमारने नेव्ही ऑफिसर रुस्तम पावरी ही भूमिका साकारली होती. आपल्या अनुपस्थितीत पत्नीला एका पुरुषाने भुलवल्यानंतर ‘रुस्तम’ने त्याची केलेली हत्या आणि त्याची देशभक्ती या विषयावर चित्रपटाची कथा आधारित आहे. रुस्तममध्ये अक्षयसोबत एलियाना डिक्रुज, इशा गुप्ता, उषा नाडकर्णी हे कलाकार झळकले होते.
गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारचे हॉलिडे, बेबी, स्पेशल 26, एअरलिफ्ट यासारखे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. सुरुवातीच्या काळात अ‍ॅक्शन हिरो अशी ओळख  असलेला खिलाडी कुमार नंतर चरित्र भूमिकाही साकारताना दिसला. अक्षय कुमारचं सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंगही प्रचंड असून त्याचे अनेक सिनेमे शंभर  कोटींच्या क्लबमध्ये गेले आहेत.
26 वर्षांच्या कारकीर्दीत फिल्मफेअर, स्टार स्क्रीन, आयफा सारखे लोकप्रिय पुरस्कार पटकावणार्‍या अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी हुलकावणी दिली. 2011  मध्ये त्याचा ‘पद्मश्री’ने गौरव करण्यात आला होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.