सुट्टीच्या दिवशी शासकीय जागेत जुगार
अहमदनगर । प्रतिनिधी । 21 - शहर व परिसरातील व जिल्ह्यातील अनेक शासकीय इमारतीमध्ये सुट्टीच्या दिवशी जुगार खेळला जात असून शुक्रवारी टाकलेल्या पराग इमारतीतील छाप्यात आठ जणांसह आठ हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य कोतवाली पोलिसांनी जप्त केले. आठ जणांना अटक करुन रात्री त्यांची सुटका करण्यात आली.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील अनेक शासकीय इमारतीमध्ये सुट्टीच्या दिवशी करमणुक म्हणून कार्यालयीन कर्मचारी अथवा चतुर्थश्रेणी कर्मचारी जुगार खेळत असल्याचे अनेकवेळा आढळून आले. मात्र, शुक्रवारी शिवजयंतीच्या मिरवणूक व कार्यक्रमात पोलिस गुंतले असतांनाच काही महाभागांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या पराग इमारतीच्या टेरेसवर जुगाराचा डाव मांडला. या घटनेची माहिती एका नागरिकाने कोतवाली पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ.टकले, विधाते, गाडीलकर, यांनी इमारतीवर छापा टाकला. यावेळी अब्दुल कुरेशी (बंगालीपुरा), शेख सलीम (मुकुंदनगर), कैय्युम कुरेशी (झावरेगल्ली), करीम बागवान (बंगालीपुरा), मधुकर कोळगे (निर्मलनगर), कदीर कुरेशी (बेपारी मोहल्ला), सववर अली इराणी (बंगालीपुरा), इजाज शेख (सुबेदार गल्ली) हे तिरट नावाचा जुगार पैशावर खेळतांना आढळून आले. पोलिसांनी त्ंयांच्या ताब्यातून 7 हजार 150 रुपये रोख, मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त केले. पुढील तपास पोलिस नाईक गाडीलकर करीत आहेत.
पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी अवैध धंदे चालकांची दमछाक केली आहे. गुन्हेअन्वेशण शाखेच्या पथकामार्फत जिल्ह्यातील जुगार, मटका, दारु अड्ड्यावर छापा सत्र सुरु केले आहे. या पथकाबरोबरच शहर व ग्रामीण उपअधिक्षक पथकही कार्यरत आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे जोरात सुरु आहेत. शहरातील अनेक चौकातील रात्री चालणार्या हातगाड्यांवर दारुची सर्रास विक्री केली जाते. अनेक मद्यपी शौकीन हातगाडीसमोरच दारु अड्डा बनवित आहेत. विना परवाना सर्रास पोलिस ठाण्यासमोरच दारु विक्री केली जाते.
पोलिसांचे अवैध धंद्दे चालकांशी संग्लनमत व आर्थिक तडजोडी असल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचारी अवैध धंद्यावर छापे टाकण्यास धजावत नाही. छापे टाकल्यास अवैध धंद्दे चालवणारे पोलिसांनाच दमबाजी करुन लाचलुचपतची धमकी देत आहेत. त्यामुळे अवैध दारु व मटका जिल्ह्यात जोमात सुरु आहे. याचाच परिणाम अवैध धंद्दे बोकाळले आहेत. त्यामुळे विविध पथकाद्वारे छापा सत्र सरु आहेे.