Breaking News

भीमा नदीपात्रास जलपर्णीचा वेढा


कुळधरण / प्रतिनिधी 
कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथुन वाहणार्‍या भिमा नदी पात्राच्या पाण्यावर जलपर्णीने वेढा घातल्याने नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रात सोडण्यात आलेल्या मैलामिश्रीत घटकांमुळे नदीपात्र दूषित झाले आहे.
सिध्दटेक हे तिर्थस्थळ असल्याने, नदीतीराच्या घाटावर दररोज दशक्रीया विधी पार पडतात. मुंडण करतेवेळी पडलेले केस व नदीपात्रात सोडण्यात येणारे जुने कपडे यामुळे प्रदुषणात भर पडत आहे. घाटावर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असुन, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. काठावर राहणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांनी शेतीसाठी उचलण्यात येणार्‍या विजपंपाचे मोठ्या प्रमाणात असणारे जाळे आहे. नदीच्या विस्तीर्ण पात्रामुळे सतत होणार्‍या वाळुउपशामुळे भर पडत आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात भर पडत असल्याने भीमा नदी पात्राला गटारीचे रुप आले आहे.
नदीच्या या अवस्थेमुळे नदीत चालणार्‍या बोटिंग व्यवसायालाही फटका बसत आहे. प्रशासनाने या प्रश्‍नावर दखल घेवुन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी प्रा. सोमनाथ गोडसे यांनी केली आहे.