Breaking News

संत मुक्ताबाई पालखीचे पंढरीला प्रस्थान


सोलापूर, दि. 20, जून - महाराष्ट्राचे आराध्य दैवत भगवान पांडुरंगाचे भेटीसाठी आषाढी वारीकरिता प्रमुख मानाच्या संत मुक्ताबाई पालखीचे कोथळी-मुक्ताईनगर समाधीस्थळ येथून लवाजम्यासह भक्तिपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने यंदाच्या आषाढी वारीत राबवण्यात येणार्‍या श्री विठ्ठल निर्मल दिंडी अभियानाचा शुभारंभ झाला . सुमारे 309 वर्षांपासून वै. राम महाराज दुधलगावकर यांनी सुरू केलेल्या मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यभरातून व शेजारी मध्यप्रदेशातून आलेल्या भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. पहाटे काकडारती, मंगलमय वातावरणात सायली व कुणाल भोसले यांनी महापूजा केली. प्रस्थान सोहळ्यानिमित्त सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. निर्मल वारी हरित वारी’ या अ भियानांतर्गत वारकर्‍यांना बियाणांची पाकिटे वाटण्यात आली. ते बियाणे वारकरी भाविकांनी मुक्कामाच्या गावी लावावे जेणेकरून तेथील भाविक मुक्ताई वृक्ष म्हणून संगोपन करतील, अशी आशा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार समितीचे सदस्य शिवाजीराव महाराज मोरे यांनी या वेळी व्यक्त केली.