Breaking News

चित्रपट महोत्सवातून तीन दिवस मिळणार पाणी बचतीचा संदेश

पुणे, दि. 12, नोव्हेंबर -स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि वसुंधरा क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राधिकरण निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे तीन दिवसीय किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास सुरुवात झाली. चित्रपट महोत्सवात तीन दिवस ’नदी वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेवर आधारित लघुपट, अनुबोधपट दाखविले जाणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.



उदघाटनानंतर लगेच पर्यावरण विषयक विविध लघुपट आणि अनुबोधपट प्रदर्शित करण्यात आले.भास्कर रिकामे यांनी प्रास्तविकामध्ये महोत्सव आयोजित करण्यामागील भुमिका स्पष्ट केली.निसर्ग आणि पर्यावरणक्षेत्राशी संबधित असलेल्या समस्या व आव्हानांचा शोध घेऊन, त्यावर कायमस्वरूपाची उपाययोजना व समाधान शोधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मागील दोन वर्षांपासून प्राधिकरण निगडी येथे आयोजित केला जात आहे. 

विद्यार्थी दशेतच चांगल्या आणि सामाजिक गोष्टींबाबत युवकांना सजग केल्यास विविध समस्या सहज सुटू शकतात. विद्यार्थी आणि युवकांना केंद्रस्थानी ठेऊन ’नदी वाचवा, जीवन वाचवा’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. उदघाटनाच्या वेळी ’बुंदिराम’ नावाचा लघुपट दाखविण्यात आला. मुक्ता चैतन्य यांनी सुत्रसंचालन केले तर शैलेजा सांगळे यांनी परिचय करुन दिला. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन सभागृहात भरविण्यात आले. पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवादरम्यान शहरातील 25 पेक्षा जास्त शाळांमधून पर्यावरण विषयी प्रबोधन करणारे लघुपट दाखविले जाणार आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयीन युवकांसाठी निसर्ग अभ्यास सहलीअंतर्गत एम्प्रेस गार्डनला भेट देण्यात आली. 55 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. विजय सातपुते, दिपक पंडीत यांनी नियोजन केले.