Breaking News

चौपदरीकरण भरावासाठी होतोय गाळाऐवजी मातीचा वापर

सिंधुदुर्गनगरी, दि. 29, एप्रिल - महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणारा मातीचा भराव हा बाहेरून न आणता नदीतील गाळाचा वापर या भरावासाठी करण्यात येणार असल्याची घोषणा रत्नागिरी येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. मात्र, हायवे चौपदरीकरणांतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मंत्र्यांच्या आदेशाला ठेकेदाराकडून हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले आहे. क णकवलीतील गडनदीवरील नवीन पुलाचे काम गेले चार दिवस सुरू करण्यात आले असताना या पुलाच्या हळवलच्या बाजूने भरावाकरिता ठेकेदाराकडून दुसरीकडून माती आणण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील गाळ मात्र तसाच राहत असल्याने नद्यांना मोकळा श्‍वास घेण्यास आता अजून काही काळ वाट पाहवी लागण्याची शक्यता आहे.

महामार्ग चौपदरीकरणात भरावासाठी लागणारी माती ही अन्य ठिकाणांहून आणण्यापेक्षा नदीपात्रातील गाळ या भरावासाठी वापरल्यास नद्यांमध्ये पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार होती. हा मुद्दा ज्यावेळी चर्चेला आला, तेव्हा केंद्रीयमंत्री गडकरी यांनी रत्नागिरी येथे हायवे चौपदरीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी भरावासाठी नदीतील गाळ वापरण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. मात्र, चौपदरीकरणांतर्गत पुलांच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून मंत्र्यांच्या वक्तव्याला तिलांजली देऊन दुसरीकडून भराव आणला जात आहे. त्यामुळे हळवल-वागदेच्या बाजूने गडनदीचे गाळाने भरलेले पात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे जैसे-थेच राहणार आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनीही जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधले होते.