Breaking News

पत्नीवर चाकूचे वार करून बंदुकीतून झाडल्या गोळ्या

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूचे वार करुन बंदुकीतून गोळ्या झाडल्याची घटना पारनेर तालुक्यातील जामगाव येथे काल सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या त्याच्या पत्नीवर नगरच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पत्नीवर हल्ला करुन एसटीतून पारनेरच्या दिशेने जात असताना डिकसळ फाट्याजवळ एसटीला थांबवून पतीला पारनेर पोलिस ठाण्याचे हवालदार शेख यांनी पकडले. जामगावमधील युवक रमेश मेहेर यांनी आरोपीस पकडण्यास मदत केली. याप्रकरणी आरोपी नवनाथ पोपट काळे याच्यावर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामगाव येथील आरोपी नवनाथ काळे व त्याची पत्नी वैशाली यांच्यात अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद होते. हे वाद आज विकोपाला जाऊन त्याने पत्नीवर चाकूचे वार करीत बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. प्रतिकार करणारी त्याची मुलगीही यात जखमी झाली. पत्नीच्या छातीत व पोटावर चाकूचे वार असल्याने नगरमधील एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर येथील फॉरेन्सिक टीम व नगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक घुगे, पोलीस कॉन्स्टेबल दिवटे, शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

...म्हणून केला हल्ला
पत्नी व मुले ऐकत नाहीत, जेवायला देत नव्हते, असा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. या त्रासाला कंटाळून हल्ला केल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. हल्ला केल्यानंतर पारनेरकडे जाणार्‍या एसटीत बसून स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होण्यासाठी जात असताना डिकसळ फाट्याजवळ एसटी थांबून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.