व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थ्यांना कॅम्पस आवारात प्रवेश बंदी लखनऊ विद्यापीठाचा फतवा
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखनौ विद्यापीठात ’व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थ्यांना कॅम्पस आवारात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने यासंबंधी कॅम्पस परिसरात नोटीस जारी केली आहे.नोटीसमध्ये जर विद्यार्थी व्हॅलेंटाईन-डेला विद्यापीठाच्या परिसरात फिरताना आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात, अशी चेतावणी देण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्राध्यापक विनोद सिंह यांनी ही नोटीस जारी केली आहे. पाश्चात्य संस्कृतीमुळे प्रभावित होऊन 14 फेब्रुवारी या तारखेला व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्यात येतो. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की 14 फेब्रुवारी 2018 ला महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुट्टी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात विद्यार्थ्यांना प्रवेशास बंदी आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. विनोद सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आवाहन केले आहे, की येत्या 14 फेब्रुवारीला त्यांनी आपल्या पाल्यांना महाविद्यालयात पाठवू नये. जर 14 फेब्रुवारीला विद्यार्थी विद्यापीठाच्या परिसरात फिरताना आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. परिसरात कोणताही विद्यार्थी फिरकू नये यासाठी कॉलेजच्या परिसरात कर्मचार्यांची करडी नजर असणार आहे, अशी माहितीही विनोद सिंह यांनी दिली.
