Breaking News

फसवणूक प्रकरणात बिल्डर पारेखला जामीन


फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला विक्रोळीतील बिल्डर हेमंत पारेख याला जामिनावर सोडण्यात आले. पारेख याने रिझवान खान याला ३० लाखाला फसवले होते. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी खान याच्या तक्रारीवरून पारेख याला अटक केली होती. 

सत्र न्यायालयाने पारेख याला जामीन मंजूर करताना ३० लाख रुपये विक्रोळी न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. बिल्डर पारेख विक्रोळी येथील हरियाली व्हिलेज येथे ॲलेना रेसिडेन्सी निवासी प्रकल्प उभा करणार होता. त्यातील एक फ्लॅट खान याने आरक्षित केला होता. त्या फ्लॅटची किंमत ८३ लाख रुपये होती. खान याने २०१४ मध्ये ३० लाख रुपये पारेख याच्या प्रकल्पात गुंतवले होते. 

तीन वर्षे उलटून गेली तरी हा गृहप्रकल्प पारेख याने पूर्ण न केल्यामुळे पारेख याने आपली फसवणूक केल्याबाबतची तक्रार खान याने टिळकनगर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी पारेखविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची दखल घेऊन पोलिसांनी पारेख याला अटक केली.