Breaking News

साईबनमध्ये दोन परिवारातील सदस्यांचे प्राण वाचवल्याबद्दल त्या चार युवकांचा मनसेच्या वतीने सत्कार.

देवेंद्र बेरड, संतोष लोंढे, विलास माने, मनोज गाडळकर या चार तरुणांनी जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून नऊ जणांचा जीव वाचविला आहे. प्राणाची बाजी लावून देवदूतासारखे मदतीला धावून गेल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. त्यांनी दाखविलेल्या शौर्यातून त्यांची समाजाप्रती असलेल्या भावनांची जाणिव होत आहे, हीच भावना आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. 


या शौर्याला प्रोत्साहन देऊन इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळावी तसेच केंद्र व राज्य सरकारने या शौर्याची दखल घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आपण शिफारस करत असल्याचे प्रतिपादन मनपाच्या स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव यांनी केले. साईबन येथे बोट उलटल्याने दोन कुटूंबियांचे प्राण वाचविणार्‍या देवेंद्र बेरड, संतोष लोंढे, विलास माने, मनोज गाडळकर या चार तरुणांचा मनसेच्यावतीने सभापती सुवर्णा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेविका विणा बोज्जा, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, गिरीश रासकर, श्रीनिवास बोज्जा, दत्ता जाधव, अंबादास येन्नम आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले, सामाजात आपण वावरत असतांना अचानक एखादा प्रसंगी निर्माण होत असतो, त्यात प्रसंगसावधाता राखून समोरच्याला मदत करणे हे आपले कर्तव्य असते. 

आपल्या कृतीतून समाजात एक आदर्श निर्माण होईल, असे काम केल्यास त्याची दखल ही घेतलीच जाते. आज या मनसेच्यावतीने सत्कार करुन त्यांनी दाखविलेल्या शौर्याचे कौतुक केले आहे. त्यामुळे त्याच्या शौर्याचे कौतुक होऊन इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे. याप्रसंगी विणा बोज्जा म्हणाल्या, या चार युवकांनी दाखविलेल्या प्रसंगसावधानामुळे नऊ जणांचे प्राण वाचले आहेत. 

अचानक घडलेल्या प्रसंगी दाखविलेले धाडस हे कौतुकास्पद असेच आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक त्यांच्या कार्याची वरिष्ठा पातळीवर दखल घेऊन त्यांचा उचित सन्मान होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे, गिरीष रासकर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.