Breaking News

कामाचा माणुस म्हणून पठाण यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली -राजेंद्र सरग

जिल्हा माहिती कार्यालयातील कामाचा माणुस म्हणून पठाण यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. विश्‍वासर्हता कायम जपलेली व पत्रकारितेशी नाळ जोडलेले पठाण यांचे व्यक्तीमत्व असून, त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना करुन द्यावा. पत्रकार मित्रांना नाउमेद न करता, त्यांनी नेहमीच सर्वांना सहकार्य केले. माहिती कार्यालयाचे काम सुरळीत पार पडण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. असे प्रतिपादन पुणे येथील जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. 


राज्य सरकारच्या माहिती महासंचालनालय विभागा अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक हाजी फकिर मोहंमद पठाण यांच्या सेवापुर्तीनिमित्त प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करुन, त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात सरग बोलत होते. जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या या सेवापुर्तीच्या कार्यक्रमा निमित्त माजी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड.बाळ ज. बोठे, विजयसिंह होलम, माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू चौगुले, मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मिनाताई मुनोत आदि व्यासपिठावर उपस्थित होते.

मिनाताई मुनोत यांनी कोणत्याही प्रसंगी पत्रकारांना मदतीचा हात देणारा, प्रेमळ माणुस सेवानिवृत्त होत असल्याने त्यांची या विभागाला उणीव भासणार असल्याचे सांगितले. दिलीप गवळी म्हणाले की, माणस जोडण्याचा हातकंडा पठाण यांच्याकडे आहे. कोणाला नाराज न करता त्यांनी माणसे कमावली. अ‍ॅड.बाळ ज. बोठे यांनी माहिती कार्यालय व पठाण हे समीकरण जुळले होते. 
ज्या काळात पुरेश्या सुविधा नव्हत्या. तेंव्हापासून त्यांनी स्वत:ला कामात झोकून हा वलय निर्माण केला. शासकीय चौकट न सोडता त्यांनी अनेकवेळा पत्रकारांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, प्रकाश भंडारे, सुभाष चिंधे, हसे, चौगुले, लैलेश बारगजे, दत्ता इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन पठाण यांना भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेस क्लबसह विविध माध्यम, पत्रकार संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पठाण यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना पठाण म्हणाले की, 39 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलो तरी पत्रकारांसाठी नेहमीच सहकार्य असणार आहे. नोकरीतून सेवानिवृत्ती झालो, मात्र पत्रकारांच्या मनातून निवृत्ती घेणार नसल्याचे सांगत. त्यांनी प्रेस क्लबच्या वतीने सर्व पत्रकारांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश महाराज देशपांडे यांनी केले. आभार आबिद खान यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व वृत्तपत्र छायाचित्रकार उपस्थित होते.