Breaking News

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

लातूर / प्रतिनिधी. - सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, गुुरुवारी (दि. २९) दुपारी मोरेनगर परिसरात घडली. या संदर्भात पतीसह चौघांविरुध्द शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वरवंटी (ता. लातूर) येथील राजकुमार नागनाथ खोबरे यांनी तब्बल ७ लाख रुपये हुंडा देऊन चार महिन्यांपूर्वी आपली मुलगी ममता (२०) हिचा विवाह सतीश मेघराज बेल्लाळे याच्याशी करून दिला होता. सासर शहरातील मोरेनगर येथे असल्यामुळे मुलगी जवळच असल्याचा आनंद त्यांना होता, परंतु लग्नानंतर महिनाभरातच सासरच्या लोकांनी स्टेशनरी दुकान टाकण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये घेऊन ये म्हणून तगादा सुरू केला. 

यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली. ममतानेही हा सर्व प्रकार वेळोवेळी आई-वडिलांच्या कानावर टाकला. प्रत्येक वेळी माहेरहून समजूत काढण्यात येत होती आणि ममताच्या छळामध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. अखेर असह्य झालेल्या ममताने गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मोरेनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.