Breaking News

दखल - काँग्रेसवर मनसे स्ट्राईक!

खरं तर कायदा हातात घेणं चुकीचंच आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप असो, की अन्य पक्ष; त्यांनी घटनेनं घालून दिलेल्या नियमानुसार वागायला हवं. त्याला कोणताही पक्ष, नेता अपवाद असता कामा नये; परंतु काहींना गुंडगिरी करून त्याचं भांडवल करण्याची सवय असते. विकासकामांपेक्षा असं करणं सोपं असतं. संघटनात्मक काम करता आलं नाही, तर भावनिक राजकारण करण्यावर भर दिला, की भागतं, असं काहींना सातत्यानं वाटत असतं. विशेषत: शिवसेना, मनसे यांचा भर कायम खळखट्याकवर राहिला आहे. काँग्रेस पूर्वी कधी तशी नव्हती; परंतु संजय निरुपम यांच्यासारख्या उठवळ नेत्याच्या हाती सूत्रं दिली, की काय होतं, हे काँग्रेसच्या नेत्यांच्या आता लक्षात आलं असेल. परप्रांतीय आणि त्यांची व्यावसायिक अतिक्रमणं हा आता मुंबईच्या जीवन मरणाचा प्रश्‍न बनला आहे. कोणत्याही स्टेशनवरून नीट बाहेर पडता येत नाही. पादचारी पूल, भूमिगत पूल, रस्ते अशा फेरीवाल्यांनी सर्व जागा बळकावल्या आहेत.  


मुंबईच्या चेंगराचेंगरीच्या घटनेमागेही हेच कारण होते. फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन करण्याचीा जबाबदारी पालिकांची असली, तरी त्यांनी कोठेही व्यवसाय करून नागरिकांचं चालणंच हराम करावं, असा त्याचा अर्थ नाही. फेरीवाल्यांच्या प्रश्‍नासाठी जरूर भांडायला हवं; परंतु त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकालही दुर्लक्षित करावं असं नाही. मुंबईतील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी मोर्चा काढून पालिकांना पुरेसा वेळ दिला. त्यांचं ते आंदोलन सनदशीरच होतं. महापालिका आणि रेल्वेनं त्यावर कारवाई करायला हवी. या दोन्ही यंत्रणा डोळे झाकून बसल्यानंतर मनसेनं तिच्या स्टाईलनं फेरीवाल्यांना हुसकावून लावलं. मनसेच्या या आंदोलनाचं आणि कायदा हातात घेण्याच्या कृतीचं समर्थन करता येत नाही; परंतु तिच्यावर ही वेळ कुणी आणली? 

मुख्यमंत्र्यांनी राज यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यांनी जरी बेकायदेशीर फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश दिले असते, तर मनसेला आंदोलन करण्याची वेळच आली नसती. मनसेनं आंदोलन केलं. फेरीवाल्यांना हटविलं. नागरिकांना स्टेशनवर मोकळेपणानं बाहेर पडता आलं. जे काम पोलिस, महापालिका, रेल्वेनं करायचं, ते त्यांनी का केलं नाही? त्याचं उत्तर राज यांनी दिलं. महिन्याला दोन हजार कोटी रुपयांचा हप्ता वेगवेगळ्या यंत्रणांना द्यावा लागत असेल, तर फेरीवाल्यांच्या अरेरावीला या यंत्रणाच जबाबदार आहेत. मनसेच्या आंदोलनानंतर फेरीवाल्यांना याच निरपम यांनी भडकावलं. त्यांना चिथावणी दिली. मनसेच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले. वरताण म्हणजे त्याचं समर्थन केलं. एवढं करूनही पोलिसांनी गुंड फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली नाही. त्यानंतरही राज यांनी शांत बसावं, अशी निरुपम यांची अपेक्षा होती का ? 

फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या सैनिकांना चिथावणी द्यायची आणि हल्ला झाला, की त्यांच्या विरोधात पुन्हा भ्याड असल्याची टीका करायची. परप्रांतीयांच्या मतासाठी चाललेलं हे नाट्य आहे. मग मराठी मतांच्या धु्रवीकरणासाठी राज यांनी प्रयत्न केले, तर त्यांना दोष कसा देता येईल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँगˆेस कार्यालयाची तोडफोड केल्यापˆकरणी मनसेचे नेता संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: होऊन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. देशपांडेंसह पोलिसांनी मनसेच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. मुंबईत परपˆांतीयांच्या मुद्द्यावरुन काँगˆेस आणि मनसेनेमधील संघर्ष पेटला आहे. शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँगˆेसच्या कार्यालयावर हल्ला केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. 

मनसेनं भय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला असून इट का जवाब पथ्थर से मिलेगा, असं टि्वट देशपांडे यांनी केलं. त्यावर निरुपम यांनी करारा जवाब मिलेगा असं म्हणत संतप्त पˆतिक्रिया दिली आहे. टि्वटरच्या माध्यमातून निरुपम यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली, ही त्यांची प्रतिक्रिया मनसेच्या कार्यकर्त्यांना आणखी हल्ला करायला भाग पाडणारी आहे. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेनं रेल्वे स्टेशन परिसरात बसणार्‍या फेरीवाल्यांविरोधात रुद्रावतार धारण केल्यामुळं मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांनी मोकळा श्‍वास घेतला. आज मुंबई शहर आणि उपनगरातल्या रेल्वे स्थानकांच्या आसपासचा परिसर जो मोकळा दिसतोय त्याचं श्रेय मनसेला जातं. कार्यालयावर हल्ला करुन आपण ठोकशाहीमध्येही मागं नसल्याचं मनसेनं दाखवूनं दिलं आहे. 

विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर निरुपम यांनी टि्वट करुन मनसेच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हटलं होतं. विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला त्यांनी गुंडगिरी सोडून द्यावी असं ते म्हणाले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांचे हे शब्द मनाला लावून घेतले आणि थेट काँग्रेस कार्यालय फोडून गुंडगिरी काय असते ते निरुपम यांना दाखवून दिलं. मुंबईत दोन ठिकाणी फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्यांना मार पडल्यामुळं थेट पक्षाची रेप्युटेशनच पणाला लागली होती. राज यांनी विभाग अध्यक्षांची बैठक घेऊन यापुढं मार खाल्ला तर पदावरुन काढून टाकू असा इशाराच दिला. मागच्या तीन वर्षातील सलगच्या पराभवांमुळं आधीच कार्यकर्त्यांची वानवा असताना उरला सुरला दरारा टिकवण्यासाठी असं काही तरी करुन दाखवणं मनसेची गरज बनली होती. त्यातूनच काँग्रेस कार्यालयावर हा हल्ला झाला. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेनं आपली दादागिरी पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन दाखवावी, असा टोला पुन्हा एकदा लगावला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात मुंबईच्या उभारणीत उत्तर भारतीयांचा सहभाग आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यावर मनसेनं मुख्यमंत्र्यांना भैयाभूषण पुरस्कार द्यावा अशी टीका केली होती. 

काँग्रेसच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं छायाचित्र जाळून निषेध केला. मनसैनिकांना झालेल्या मारहाणीचं निरुपम यांनी समर्थन केलं होतं. हा निर्लज्जपणाच आहे. आता त्यांना काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यामुळं टीका करण्याचा अधिकार राहिलेला नाही. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीवˆ निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, जेव्हा परप्रांतीयांची बाजू घेऊन निरुपम लढत होते, त्या वेळी काँग्रेसच्या राज्यातील एकाही नेत्यानं त्यांची बाजू घेतली नव्हती, हे विशेष! कार्यकर्त्यांना रोज फेरीवाल्यांकडून मार खावा लागत असल्याने मी मनसेची निराशा समजू शकतो, त्यांचं वक्तव्य आगीत तेल ओतणारं आहे.