माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल
पाटणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी ते आपला लोकसभा मतदारसंघ कटिहारच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, तब्येत अधिकच बिघडल्याने त्यांना मंगळवारी हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीतील रुग्णालयात हलविण्यात आले. पूर्ण तपासण्या केल्यानंतरच आजाराबाबत माहिती होईल, असे पक्षाचे प्रवक्ते अनिल किशोर झा यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे महासचिव अन्वर यांची एका कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी कटिहारहून पाटणाकडे जात असताना प्रकृती खराब झाली होती. यानंतर त्यांना स्थानिक रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.