Breaking News

अंगणवाडी भरते मंदिरात, जुनी वास्तू बनली धोकादायक,प्रशासनाकडुन दखल नाही


कुळधरण/प्रतिनिधी/- नगर तालुक्यातील निंबोडी येथील शालेय इमारत दुर्घटनेनंतर काही दिवसातच कर्जत तालुक्यातील बेर्डी येथील १६३ क्रमांकाच्या अंगणवाडीचा काही भाग कोसळला.सुदैवाने जीवितहानी टळली.घटना घडून सहा महिने उलटले तरी शिक्षण विभागाने कसलेच पाऊल न उचलल्याने चिमुकल्या बालकांना आता मंदिरात स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.

सध्या अंगणवाडीची चिमुकली मुले मंदिरामध्ये थंडी- वाऱ्यामधे शिक्षण घेत आहेत.सध्या मंदिरात भजन -आरतीच्या आवाजच्या ठिकाणी ही बालके शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.दुर्घटना घडताच प्रशासकिय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.नविन इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही दिले.मात्र अद्यापपर्यंत याबाबत कसलीच कार्यवाही झाली नाही.


भग्न झालेल्या इमारतीची दुरुस्ती अथवा नवीन इमारतीचे बांधकाम असे कुठलेच पाऊल उचलले गेले नसल्याने पालक संतप्त झाले आहेत.अंगणवाडी सेविका छाया नारायण भोसले तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या चार वर्षापासून पाठपुरावा सुरु ठेवला मात्र त्याला दाद मिळाली नाही.कर्जत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवले. मात्र त्यावर काहीच अंमलबजावणी झाली नाही.

या प्रश्नी निवेदन करण्यात आले असुन त्यावर अमोल भोसले,रमेश भोसले,नारायण भोसले,माऊली भोसले,भरत परकाळे,सोमनाथ चव्हाण,संतोष भोसले,मोहन भोसले,योगेश भोसले आदींच्या सह्या आहेत.कर्जत पंचायत समितीतील शिक्षण विभागाचा गलथान कारभार जनतेसमोर येत आहे.मुले असुरक्षित ठिकाणी शिक्षण घेत आहेत.जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा पालकांचा प्रश्न आहे.गट शिक्षण अधिकारी यावर काय निर्णय घेतात? याकडे पालक व ग्रामस्थांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आश्वासनवरच बोळवण-

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन अंगणवाडी इमारतीचा प्रश्न मांडला. मात्र आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही.आज विद्यार्थ्यांना मंदिरात बसावे लागत आहे याला प्रशासनच जबाबदार आहे.इमारतीचा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास जिल्हा परिषदेच्या दालनात पालक व विद्यार्थ्यांसह बसणार आहोत. -नंदाताई भोसले, ग्रामपंचायत सदस्य,सिध्दटेक-बेर्डी ,