Breaking News

समृद्धी महामार्गास नाशिकसाठी ‘डेडिकेटेड कनेक्टर’चा विचार – मुख्यमंत्री


नाशिक :- शहराला नवा आकार देण्याचे काम बांधकाम व्यावसायिकच करू शकतात. शेल्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकचा ब्रॅण्ड विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गास नाशिकसाठी ‘डेडिकेटर कनेक्टर’ देण्याचा निश्चित विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

क्रेडाई नाशिकच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित ‘शेल्टर-2017’ प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, महापौर रंजना भानसी, शेल्टर समितीचे अध्यक्ष सुनिल कोतवाल, समन्वयक उदय घुगे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोणतेही शहर हे त्या शहरातील आपुलकीने वागणाऱ्या नागरिकांमुळेच मोठे होते. क्रेडाईने हे आपुलकीचे नाते जपले असून आपल्या सर्वांच्या माध्यमातून नाशिकला स्मार्ट सिटी बनवायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे 2022 अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वाधिक गुंतवणूक ही बांधकाम व्यवसायात होणार आहे. शहरी भागात 10 लाख व ग्रामीण भागात साडेबारा लाख घरे बांधावयाची असल्याने क्रेडाईने हे शिवधनुष्य पेलण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका 30 हजार घरे तर नागपूर महानगरपालिका 10 हजार घरे बांधत आहे. नाशिक शहरातही या प्रकारची घरे बांधण्यासाठी सहभाग घेऊन महापालिकेमार्फत अशी घरे बांधण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यास केंद्र व राज्य शासनामार्फत तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.