Breaking News

मतिमंद बालिकेवर बलात्कार करणार्‍या मावस भावाला अटक.


रत्नागिरी, दि. 12, नोव्हेंबर - कुरतडे (ता. रत्नागिरी) येथे 14 वर्षीय मतिमंद बालिकेवर मावसभावाने बलात्कार केल्याचे पुढे आले आहे. काल (दि. 10 नोव्हेंबर) या बा लिकेच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी विकास शांताराम शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली.

कुरतडे येथे अत्याचारित बालिका आपल्या नातेवाईकांसह राहते. तिचा मावसभाऊ जवळच राहत असल्याने त्याचे यांच्या घरी नेहमीचे येणे-जाणे होते. नातेवाईक असल्याने घरातील लोकांनीही त्याच्याबद्दल संशय घेतला नव्हता. बालिकेचे वडील, बहीण कामानिमित्त घराबाहेर असतात.

आई शेतीच्या कामासाठी बाहेर जाते. याचा फायदा घेऊन मे महिन्यात विकास शिंदे याने बालिकेच्या असहायतेचा फायदा उठवत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर वारंवार संधी मिळेल तेव्हा अत्याचार सुरूच होते. बालिका मतिमंद असल्याने तिने याबाबत कोणालाही सांगितले नाही. 

बालिका पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर नातेवाईकांच्या ही गोष्ट लक्षात आली. गावातील इतर नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर बालिकेसह नातेवाईक ांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बालिकेची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काल रात्री उशिरा ग्रामीण पोलिसांनी बालिकेच्या मावसभावाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपी विवाहित आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा तपास सुरू आहे.