Breaking News

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर - सचिन सावंत.

मुंबई, दि. 12, नोव्हेंबर - काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून,यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.


सावंत यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत केल्या जाणार्‍या राज्य सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली. यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले क ी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2015 मध्ये गुजरातेत 63 हजार 823 कोटी, छत्तीसगडमध्ये 36 हजार 511 कोटी, कर्नाटकात 31 हजार 544 कोटी तर महाराष्ट्रात 32 हजार 919 कोटी रूपयांची गुंतवणूक प्रस्तावित होती. 2016 मध्ये कर्नाटकमध्ये 1 लाख 54 हजार 131 कोटी, गुजरातेत 53 हजार 621 कोटी तर महाराष्ट्रात 38 हजार 084 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले.
2017 च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कर्नाटकात 1 लाख 47 हजार 625 कोटी रूपये, गुजरातमध्ये 65 हजार 741 कोटी तर महाराष्ट्रात 25 हजार 18 कोटी रू पयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. यंदाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत जेमतेम एक तृतियांश गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. पूर्वी गुजरात महाराष्ट्रापेक्षा किती तरी पिछाडीवर असायचा. परंतु, विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणाचा गुजरात लाभार्थी असल्याचे दिसून येत असल्याची मार्मिक टीका सचिन सावंत यांनी केली.

देशातील गुंतवणुकीच्या तुलनेत 2015 मध्ये महाराष्ट्रात 10.7 टक्के, 2016 मध्ये 9.28 टक्के तर 2017 च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत केवळ 7.53 टक्के इतकी गुंतवणूक आली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची अधोगती सांगण्यास पुरेशी आहे. केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सन 2000 ते 2012 या काळात देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात एकूण 61.13 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली होती व देशाच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 33 टक्के होते.