Breaking News

राज्य कृषी बाजार समितीची जानेवारीत निवडणूक ?

सांगली, दि. 30, नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती संघाची निवडणूक जानेवारीमध्ये होणार आहे. त्यासाठीची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी सभापती संतोष पाटील यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे.



या बाजार समितीसाठी सांगली, कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून अवघा एक संचालक निवडला जाणार आहे. बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत या राज्य बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ही निवडणूक जानेवारी अथवा फेब्रुवारी 2018 मध्ये होणार आहे. त्यासाठी मतदार यादी निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे.

सहकार कायदा बदल 97 नुसार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बदल केला गेला आहे. बाजार समितीत यापूर्वी 41 संचालक कार्यरत होते. यापुढील कालावधीत ही संख्या के वळ 21 असणार आहे. यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातून एक संचालक निवडून देण्यात येत होता. यंदा मात्र तीन जिल्ह्यातील बाजार समितीतून एक संचालक निवडला जाणार आहे. बाजार समितीने ठराव केलेल्या संचालकास मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. अन्य कोणत्याही संचालकास मतदानाचा अधिकार नाही.

सांगली, कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील बाजार समितीतून एक संचालक निवडला जाणार आहे. सांगली जिल्ह्यात सहा, कोल्हापूर जिल्ह्यात चार, तर सोलापूर जिल्ह्यात 11 बाजार समित्या आहेत. या 21 बाजार समितीत 378 संचालक असून त्यातील एका संचालकास राज्य बाजार समितीत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. बाजार स मितीच्यावतीने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संतोष पाटील यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. सध्या राज्य बाजार समितीत सांगली जिल्ह्यातील दोन संचालक क ार्यरत आहेत.