Breaking News

बीड मध्ये मोबाइल बॅटरीचा स्फोट झाल्याने बालक गंभीर जखमी

शाळेत जात असताना रस्त्यावर सापडलेली मोबाईलची बॅटरी घेवून ती खिशात ठेवली असता या बॅटरीचा शाळेतील वर्गामध्येच स्फोट झाला. यामध्ये बालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शहरातील मोमीनपुरा भागातील एका शाळेत घडली. 


जखमी बालकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील मोहंमदीया कॉलनी भागातील रहिवाशी मोमीन कामरान खुद्दूस हा पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो. घररापासून शाळा जवळच असल्याने तो पायी ये- जा करतो. नित्याप्रमाणे तो बुधवारी सकाळी ८ वाजता शाळेत जाण्यासाठी पायी निघाला. रस्त्यात त्याला मोबाइलची बॅटरी पडलेली दिसली. उत्सकुतेपोटी त्याने बॅटरी उचलली आणि पँटच्या खिशात ठेवली.

दरम्यान, नऊ वाजता वर्ग सुरु झाल्यानंतर बॅटरी गरम झाली. त्याच्या मांडीला गरम जाणवू लागले; पण त्याने कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर काही वेळेतच खिशातच बॅटरीचा स्फोट झाला. यावेळी त्याच्या पँटने पेट घेतला. तो बाकावरुन खाली कोसळला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की वर्गातील सर्व विद्यार्थी भयभीत झाले. त्यानंतर शिक्षक त्याच्या जवळ धावून गेले. त्यांनी त्याच्या पँटची आग विझवून त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली. तो २५ टक्के भाजला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत..