Breaking News

शेतक-यांना वीजबिलाबाबत सक्ती न करता सवलत द्या - खा चंद्रकांत खैरे

औरंगाबाद, दि. 30, नोव्हेंबर - शेतक-यांची परिस्थिती गंभीर असून वीजबिलाबाबत सक्ती न करता टप्पाटप्पाने जे देईल ते घेऊन सवलत द्यावी. तसेच शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा असलेल्या रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी 127 व्या जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत महावितरणला दिल्या. 



यावर्षी पाऊस थोडा चांगला झाल्याने रब्बी हंगामात शेतकरी पिके घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना वीजपुरवठा दिल्यास फायदा होऊ शकतो. परंतु वीजबिल वसुलीच्या नावाखाली 10 ते 15 रोहित्र बंद ठेवत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जसे परिस्थिती असेल तसे बिल घेऊन सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनीही मुख्य जलवाहिनी सुरु असलेल्या विदुयत पंपांना वेगळे एक्सप्रेस फिडर जोडावे, जेणेकरून पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. 

शहरात वीजबचतीसाठी 40 हजार एलईडी फिटिंग बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेची स्थिती मजबूत झाल्यास थकबाकी लवकरच भरणार असल्याचे सांगण्यात आले.कन्नड तालुक्यातील जवळपास 40 ते 50 रोहित्रावर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने दररोज ते जळत असल्याने भार वाढवून देण्याची मागणी तालुकाप्रमुख केतन काजे यांनी केली. सिल्लोड तालुक्यातही बरेच अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी विभागप्रमुख पंकज जैस्वाल यांनी केली.