Breaking News

अत्याचार करण्यास प्रतिकार केल्याने मुलाची हत्या


मुंबई : ११ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी नराधम नातेवाईकालाच अटक केली आहे. रवी वाघेला (४२) असे आरोपीचे नाव असून बळिताने अनैसर्गिक अत्याचार करण्यास प्रतिकार केल्यावरून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे.

इरला, प्रेम नगर येथे राहणारा ऋषी राजेश वाघेला या ११ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ऋषी वाघेलाचा मृतदेह वर्सोवा, यारी रोड येथील कवडी खाडी येथे आढळल्याने एकच खळबळ माजली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असता ऋषीचा हा मृतदेह असल्याचे उघड झाले. 


या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट-९ च्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून यातील संशयित असलेला ऋषीचा चुलत चुलता रवी वाघेला याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ६ मुलींचा पिता असलेल्या रवीने ऋषीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ऋषीने विरोध केला आणि आरडाओरड सुरू केली. आपली बदनामी होईल या भीतीने रवीने ऋषीची हत्या करून मृतदेह कवडी खाडी येथे टाकला.