Breaking News

प्रभागानिहाय आरक्षण सोडत प्रक्रियेत वादावादी न्यायालयात जाण्याचा ग्रामस्थांचा निर्धार


राहाता प्रतिनिधी - मार्च २०१८ मध्ये पुणतांबा ग्रामपंचायतीच्या होणार्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना व त्या आधारे काढण्यात येणार्या आरक्षणाच्या सोडतप्रक्रियेत मंगळवारी बोलविलेल्या विशेष ग्रामसभेत वादावादी झाली. प्रभागांच्या पुनर्रचनेबाबत उपस्थित बहुतांशी राजकीय नेते व ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रभाग पुनर्रचना मान्य नसल्यामुळे याबाबत अनेकांनी लेखी हरकती देण्यास सुरुवात केली असून वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा निर्धारही व्यक्त केला.

सरपंच छाया जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पंडित दीनदयाल सांस्कृतिक भवनात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणुकीच्या कामासाठी तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून राहाता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. बी. गायकवाड, कामगार तलाठी गणेश वाघ तसेच उपसरपंच प्रशांत वाघ, जिल्हा परिषद सदस्य श्याम माळी, पुणतांबा विकास आघाडीचे संस्थापक धनंजय जाधव, डॉ. धनंजय धनवटे, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, सुभाष वहाडणे, ‘गणेश’चे संचालक राजेंद्र थोरात, बाळासाहेब चव्हाण, प्रणिल शिंदे, भाऊसाहेब केरे, सर्जेराव जाधव, संभाजी गमे, सुधाकर जाधव, अशोक धनवटे, नामदेव धनवटे, ग्रामसेवक आर.बी. डुबे, अनिल नळे, दादा सांबारे, राजू शिरसाठ, राहुल जोगदंड, बाळासाहेब जाधव, संदीप वहाडणे, अमोल सराळकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मार्च २१०८ ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रभाग प्रारूप रचनेबाबत संक्षिप्त माहिती दिली. ज्या प्रभागात सदस्य संख्या दोन होती त्यात बदल घेऊन ती तीन होणार व रोटेशन पध्दतीने दुसर्या प्रभागाची संख्या दोन होऊन काही प्रभागांची पुनर्रचना होईल असे स्पष्ट केले.

यावेळी प्रभाग एकची संख्या दोन वरून तीन व दोनची संख्या दोन होणार असून त्यानुसार प्रभागांच्या पुर्नरचनेचा प्रारुप तपशील जाहीर केला. यावेळी लोकसंख्येनुसार प्रारूप बदल स्पष्ट करताना काही प्रभागाचा काही भाग दुसर्या प्रभागाला जोडल्याचे व काही भाग वगळल्याचे स्पष्ट करताच अनेकांनी जोरदार आक्षेप घेतला. तीन चार पाच सहा या प्रभागांची पुनर्रचना करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करून अधिकार्यांना धारेवर धरले. यावेळी काही काळ गोंधळही झाला. गायकवाड यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ज्यांना आक्षेप असेल त्यांनी लेखी हरकती द्याव्यात, असे स्पष्ट केले व त्यानंतर लहान मुलांच्या हाताने आरक्षणाची सोडत काढली.

प्रभागानुसार आरक्षण :

प्रभाग : १ सर्वसाधारण पुरुष, १ अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्ग १, ना. मा. प्रवर्ग स्त्री १,

प्रभाग : २ अनुसूचित जमाती पुरुष १, सर्वसाधारण स्त्री १,

प्रभाग : ३ ना. मा. प्रवर्ग पुरुष १, सर्वसाधारण स्त्री १ अनुसूचित जमाती स्त्री वर्ग १,

प्रभाग : ४ सर्वसाधारण पुरुष १ अनुसूचित जागी प्रवर्ग पुरुष १ ना. मा प्रवर्ग स्त्री १,

प्रभाग : ५ सर्वसाधारण पुरुष १ ना. मा प्रवर्ग पुरुष १ अनुसूचित जाती स्त्री १,

प्रभाग : ६ सर्वसाधारण पुरुष १ सर्वसाधारण स्त्री १ ना. मा. प्रवर्ग स्त्री १ अशा प्रकारे प्रारूप प्रभाग रचनेनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणाच्या नियमानुसार स्त्रीयांना पन्नास टके आरक्षण देण्यात आले आहे. याबाबत ११ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत आहे व अंतिम यादी दि. ८ जानेवारी २०१८ ला प्रसिध्द होणार आहे. प्रशांत वाघ यांनी आभार मानले.