Breaking News

बँक ऑफ बडोदावरील दरोड्यातील नवव्या आरोपीला अलाहाबाद येथून अटक.


बँक ऑफ बडोदावरील दरोडा प्रकरणात सहभाग असलेल्या आदेश वर्मा नामक नवव्या आरोपीला अलाहाबाद येथून अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ३०० ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांनी या दरोडा प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या नऊ आरोपींकडून सुमारे तीन किलोंपेक्षा अधिक दागिने हस्तगत केले आहेत. या सर्व गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

जुईनगर येथील बँक ऑफ बडोदावर अंडरग्राऊंड भुयाराच्या माध्यमातून दरोडा टाकून फरार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील श्रावण हेगडे, मोईन खान, हाजीद अली मिर्झा बेग आणि अंजन मांझी या चौघांना सर्वप्रथम बैंगणवाडी परिसरातून ईटीगा कारसह अटक केली. त्यानंतर पोलिसांनी मालेगाव येथून संजय वाघ नामक सोनाराला अटक करून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दागिने हस्तगत केले. तसेच त्याला दागिने विकून फरार झालेल्या मोईनुद्दीन शेख यास पश्चिम बंगालमधून पोलिसांनी अटक केली.


 त्यानंतर पोलिसांनी या दरोडा प्रकरणात सहभागी असलेल्या कमलेश मिश्रा या आरोपीला उत्तर प्रदेशमधून तर शुभम गंगाराम निशाद (२०) याला अलाहाबाद येथून अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. शुभमपाठोपाठ पोलिसांनी आदेश वर्मा नामक आरोपीला देखील अलाहाबाद येथून अटक केली आहे. त्याच्याकडून देखील सुमारे 3०० ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे..