Breaking News

कचराकुंड्या ओसंडू लागल्या, सोलापूर मनपाचे दुर्लक्ष

सोलापूर, दि. 24, ऑक्टोबर - एरवीच्या तुलनेत दिवाळीत कचर्‍याचे प्रमाण 20 टक्के वाढते. अशा स्थितीत कचरा उचलण्यासाठी विशेष नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, तसे  नियोजन झालेले नसल्याने शहरातील अनेक भागात कचराकुंड्या साठून आहेत. काही ठिकाणी कचरा रस्त्यावर, परिसरात विखुरला गेला आहे.रोज 300 टन कचरा निर्माण होत  आहे. पण महापालिकेने मागील चार दिवसांत सरासरी 229 टन कचरा उचलला. हद्दवाढ भागात समावेश असलेला शहरातील सर्वात मोठ्या झोन क्रमांक पाचमध्ये चार दिवसांत  फक्त 54 टन कचरा उचलला तर सर्वात जास्त झोन क्रमांक आठमध्ये 176 टन कचरा उचलला. बाजार पेठ परिसरातील झोन क्रमांक एकमध्ये 132 टन कचरा उचलला गेला.  अनेक ठिकाणी कंटेनर भरून वाहत असून, तो उचलण्याचा पत्ता नाही. सर्वत्र कचरा साचला आहे. या काळात मधला मारुती, टिळक चौक, नवी पेठ, 70 फूट रोड, अशोक चौक,  भुसार गल्ली, चाटी गल्ली, कुंभार वेस, कन्ना चौक परिसरात जास्त कचरा साचतो. तो वेळेवर उचलणे आवश्यक असून, या परिसरातील कंटेनर भरून वाहत आहेत. यात प्लास्टिक,  बॉक्स, फूल, फटाक्याचा कचर्‍यांचा समावेश आहे. महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे. शहरात रोज 300 टन कचरा निर्माण होत असून, त्यापैकी सुमारे  250 टन कचरा उचलणे आवश्यक असताना मागील चार दिवसांत सरासरी 229 टन कचरा उचलला गेला.
2 दिवसांत कचरा उचलूउत्सव काळात कचरा जास्त असतो. त्यामुळे राहिला असेल. कर्मचार्‍यांची अडचणी होती. ती दूर झाली. त्यामुळे दोन दिवसांत कचरा पूर्णपणे उचलू. झोन  पाचमधील गाडी बंद पडली होती. ती दुरुस्त केली. - संजय जोगधनकर, मनपा सफाई अधीक्षक