Breaking News

वारकरी संप्रदायाची पताका दिल्लीत फडकणार

सोलापूर, दि. 13, सप्टेंबर - अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि दिल्ली महानगरवासी यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील वर्षीच्या 2018 मध्ये दिल्लीच्या रामलीला  मैदानावर आंतरराष्ट्रीय विराट महापारायण सोहळा आयोजिण्यात आल्याची माहिती वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
2018 च्या मार्च महिन्यात 11 ते 18 तारखेदरम्यान हा सोहळा होणार आहे. यासाठी दिल्लीच्या नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. यात भारतातील विविध राज्यातील  वारकरी सांप्रदायातील भाविकांची याठिकाणी उपस्थिती राहणार आहे. आंध्र आणि कानडी भाषेत ज्ञानेश्‍वरीचे भाषांतर झाले आहे. या पारायणासाठी येणारा भाविक हा  बहुतेक करून पंढरपूरला येणाराच राहणार आहे. त्यामुळे त्याला ज्ञानेश्‍वरी माहिती असते. त्यामुळे अन्य राज्यातील भाविकांना भाषेची अडचण येणार नाही, असेही ते  म्हणाले. या पारायणासाठी 125 रुपये नोंदणी शुल्क असून भाविकांना जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा खर्च स्वत: करायचा आहे. सकाळी पारायण, दुपारी  हरिपाठ, त्यानंतर रात्री कीर्तन कार्यक्रम होणार आहे. यासाठी दिल्ली येथील विविध मठ, आश्रम, धर्मशाळा, गुरुद्वारा येथे सात दिवस राहण्याची सोय करण्यात येणार  आहे. 21 जणांचा एक ग्रुप असे नियोजन करण्यात येणार आहे. अधिक माहिती नावनोंदणीसाठी 9420959052, 9975612354 या क्रमांकावर संपर्क साधावा.  पत्रकार परिषदेस वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, बंडोपंत कुलकर्णी, बळीराम जांभळे, ज्योतिराम चांगभले, संजय पवार, आदर्श इंगळे उपस्थित  होते.