Breaking News

काँग्रेसला अपयश धुवून काढण्याची संधी- डॉ. पतंगराव कदम

सांगली, दि. 13, सप्टेंबर - पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील पराभव विसरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता ग्रामपंचायत निवडणुका  पूर्ण ताकदीनिशी लढवाव्यात. गत पराभव धुवून काढण्याची ही संधी गमावू नका, असे आवाहन पलूस तालुक्याचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव  कदम यांनी केले.
पलूस तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉ. पतंगराव कदम बोलत होते. या बैठकीस काँग्रेसचे  सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड, मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव  व काँग्रेसचे पलूस तालुका अध्यक्ष ए. डी. पाटील आदी उपस्थित होते.
पलूस तालुक्यात काँग्रेसच्या माध्यमातून आजवर विविध विकासकामे केली आहेत. सध्या ग्रामपंचायतींला अनेक अधिकार आले आहेत. त्यामुळे विकासकामांचा  आणखी उठाव करण्यासाठी ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील अपयश धुवून काढण्यासाठी  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गटतट बाजूला ठेवून काँग्रेसच्याच झेंड्याखाली निवडणूक लढवावी, अशी सूचनाही डॉ. पतंगराव कदम यांनी केली. या बैठकीत मोहनराव  कदम व जे. के. बापू जाधव यांनीही मार्गदर्शन केले.