Breaking News

बंद घरात चोरट्याचा डल्ला, 2 लाखांचा ऐवज लंपास

पुणे, दि. 13, सप्टेंबर - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 1 लाख 62 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना राहू भागातील (ता.दौंड) विहिर परिसरात  घडली आहे. चोरट्याने घरातील लाकटी कपाटातून रोख रकमेसह सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
यापूर्वीही या परिसरात अशा घटना घडल्यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राहू परिसरातून अशा प्रकारची चोरी होण्याची ही तीन महिन्यातील तिसरी घटना  असल्याने चोरांनी पोलिसांनाच आव्हान दिले असल्याचे मानले जात आहे.
या चोरीप्रकरणी सावित्राबाई दत्तात्रय घोलप ( वय 58 वर्षे रा. राहू , थोरली विहीर, ता. दौंड, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सावित्राबाई  ह्या घराला कुलूप लावून सोमवारी त्यांच्या आजारी मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्या सायंकाळी परतल्या. त्यावेळी सावित्राबाई यांना घराचे कुलूप तुटलेले  दिसले. घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यवस्त पडलेले होते व लाकडी कपाटही फोडलेले आढळले.
कपाटात असलेली रोख 18 हजार रुपये व सोन्याच्या बांगड्या, चांदीच्या पायातील पट्ट्या आदी असा 1 लाख 62 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे  निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.