Breaking News

भाजप कार्यालयात एक निनावी पत्र

पुणे, दि. 08, ऑगस्ट - पुणे महापालिकेची समान पाणी पुरवठा योजनेची निविदा रद्द झाल्यानंतर सुरू झालेला पुणे भाजपातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाही.  पुणे भाजप कार्यालयात एक निनावी पत्र येऊन पडले आहे. यात पक्षातील अंतर्गत वादावर शेरेबाजी करत पक्षाचे वाभाडे काढण्यात आले आहेत.पुणे शहरातील समान  पाणी पुरवठा योजनेच्या कामाची फेर निविदा काढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याची महापालिकेतील भाजपच्या पदाधिका-यांनी भूमिका मांडली  होती. त्यावर खासदार संजय काकडे म्हणाले होते की, पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत यावरून काकडे विरुद्ध पालिका पदाधिकारी वाद रंगला  असताना हे पत्र आल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे पत्र पोस्टाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या घरी पाठवण्यात आले आहे.या पत्रात केंद्रीय  मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर,  विजय काळे, योगेश टिळेकर, योगेश मुळीक, प्रा. मेधा कुलकर्णी, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शहर  सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, स्वीकृत नगरसेवक गोपाळ चिंतल, गणेश बिडकर यांच्याबद्दल शेरेबाजी करण्यात आली आहे. यापैकी अनेक नेते केवळ  काकडे यांच्या मदतीमुळेच निवडून आल्याचे म्हटले आहे.