Breaking News

गर्भलिंग तपासणी करणार्‍या बोगस डॉक्टरला अटक

करमाळा, दि. 07 - वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा परवाना नसताना शासनाने बंदी घातलेली असताना गर्भलिंगनिदान करणार्‍या एका बोगस डॉक्टरला शनिवारी पोलिसांनी  अटक केली आहे.
नंदकुमार रामलिंग स्वामी (47, रा. सदाशिव पेठ, पुणे, मूळ रा. दत्तनगर, बार्शी) असे डॉक्टरचे नाव आहे.अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या हद्दीत जातेगाव  (ता. करमाळा) रस्त्यावर सैनिक ढाब्यापासून 500 मीटर अंतरावर बोगस डॉक्टर नंदकुमार स्वामी गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती येथील वैद्यकीय  अधिकारी डॉ. ज्ञानदेव केमकर यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून बनावट रुग्ण म्हणून माढ्याच्या दांपत्याला या डॉक्टरला भेटण्यासाठी पाठवले होते. या वेळी  डॉक्टरने गर्भलिंग तपासणीसाठी होकार देत 22 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर बोगस डॉक्टरने स्वतःच्या मोटारीत संबंधित बनावट महिलेची गर्भ  तपासणी केली. त्याच वेळी डॉ. केमकर यांच्या पथकाने धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याच्या गाडीत लॅपटॉप, अल्ट्रासाउंड सिस्टिम, सोनोग्राफी मशीन  अवैध ऑपरेशनचे साहित्य आढळले. पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली.