Breaking News

खोत यांनी संघटनेच्या हिताविरोधात वर्तन केले : दशरथ सावंत

पुणे, दि. 08, ऑगस्ट - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी संघटनेच्या हिताविरोधात वर्तन केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आज खोत  यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी केली.
काही दिवसांपासून सदाभाऊ खोत यांच्या नैतिक वर्तनाची जाहीर चर्चा होऊन त्यांच्या चारित्र्याभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम संघटनेच्या  नैतिक शिस्तीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा ठरू शकतो, असे मत स्वाभिमानी संघटनेच्या कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने व्यक्त  केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश आणि समितीचे सदस्य प्रा. डॉ. प्रकाश पोफळे, वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि समितीचे सदस्य रविकांत  तुपकर आणि समिती सदस्य सतीश काकडे उपस्थित होते.
सदाभाऊ खोतांना 2014 सालच्या निवडणुकीत भाजपने शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचा भंग केल्याचे दुःख अजिबात दिसत नाही. मागील काही दिवसांपासून  त्यांच्या चळवळीवरील निष्ठेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. संघटनेचा विचार सत्ता परिवर्तनाचा नसून कष्टकर्‍यांच्या घामाला न्याय मिळवून देण्याचा आहे.  सदाभाऊ खोत हे त्यामध्ये बसणारे नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.शिवाय शेतकरी स्वाभिमानी संघटनेतील  पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनेशी संबंध आलेल्या न आलेल्या अनेकांकडून अशा व्यक्तीला काढून टाकण्यास तुम्ही विलंब का करीत आहात? असा सवाल  आम्हाला विचारला जात होता. त्यामुळे या सर्वांचा विचार करून सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्वरित काढून टाकण्याचा निर्णय समितीने  घेतल्याचे सावंत यांनी सांगितले.